Saturday, March 11, 2006

राजा - एक स्मरण

आज पावसाने अचानक हजेरी लावली. मला पाऊस नेहेमीच आवडतो. म्हणून रात्रीचं जेवण झाल्यावर, ओसरीतले दिवे मालवून, मी तिथल्या आरामखुर्चीवर विसावले. हवेत हलकासा सुखद गारवा होता, मातीचा मंद गंध आसमंतात दरवळत होता. रात्रीची नीरव शांतता अधून-मधून भंग करणारे गडगडणारे आभाळ आणि पावसाच्या थेंबांची टपटप; मन सहज भूतकाळात गेले.

मी आठवीत शिकत होते, नोव्हेंबर महिना होता. बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी, एक काका-काकू आमच्या घरी आले; माझी त्यांची ओळख नव्हती. त्यांच्याकडील nylonच्या जाळीदार पिशवीतून त्यांनी हळूच एक गोंडस Pomeranian कुत्र्याचे पिल्लू काढले. पांढऱ्याशुभ्र केसाचे ते गोंडस गुबगुबीत पिल्लू, एखाद्या कापसाच्या किंवा बर्फाच्या गोळ्यासारखेच भासले. प्राण्यांची आवड असणाऱ्या माझ्या धाकटया बहिणीला ते पिल्लू पाहून कोण आनंद झाला! कुत्र्यांची भीती वाटणारी मी मात्र, दुरूनच त्याला कौतुकाने न्याहाळत होते. बाबा गावाहून आल्यावर ह्या गोंड्याचे, 'राजा' असे नामकरण करण्यात आले. मातोश्रींनी गोंड्याला घरात आणण्याच्या विरोधात बंड पुकारलं, परंतू अखेर आमच्याकरता म्हणून माघार घेतली. (का गोंड्याच्या रूपाने तिला भुरळ घातली कोण जाणे! अजूनही पाळीव प्राणी हा आमच्या घरातील एक संवेदनशील विषय आहे!....असो.)

हळूहळू माझी राजा बाबतची भीड चेपली. नव्या नवलाईच्या दिवसात, राजाला आंघोळ कोण घालील, खायला कोण देईल, फिरायला कोण नेईल, केस कोण विंचरेल, प्रत्येक गोष्टीवरून आम्हा बहिणीत भांडणं होत. आमची भांडणं असह्य झाली की बाबा, राजाला 'कुणाला तरी देऊन टाकीन' अशी धमकी देत, की मग आम्ही चिडी-चूप!

Pomeranian कुत्री म्हणे हट्टी असतात. आमचा राजाही त्याला अपवाद नव्हता. आम्ही सगळे घरात असलो, किंवा पाहुणे आल्यावर घरात गप्पा रंगल्या की राजालाही त्यात सहभागी व्हायचे असायचे. अशावेळी, भुंकून, आरडाओरडा करून तो स्वतःला आमच्या कंपूत सामील करून घ्यायचा. घरात घेतल्याशिवाय तो शांतच होत नसे; जिथे माणसं तिथे तो रमायचा.

त्याला औषध घ्यायला लावणे हा एक कसरतीचा प्रकार असायचा. जेवणात औषध आहे, हे पट्ठयाला बरोबर कळायचे. जेवणात लपविलेली औषधाची गोळी वगळून तो सर्व काही संपवायचा तर कधी औषधाचा सुगावा लागल्यावर उपाशी रहायचा. ब्रेड त्याला अतिशय प्रिय, म्हणून आम्ही कधी, ब्रेडच्या तुकड्यात औषधाची गोळी लपवून औषध त्याच्या गळी उतरवायचो, तर कधी तो काहीही केलं तरी गोळी थूंकून आम्हाला वैताग आणायचा!

राजाच्या खाण्यापिण्याच्या आवडीही त्याच्या नावाप्रमाणेच राजेशाही होत्या. ब्रेड आणि भात म्हणजे जीव की प्राण! गोडाचे सर्व प्रकार खायला सदैव तयार. आवडीच्या मेव्याचा सुगावा लागताच, त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलायचे. 'मला खाऊ हवाय' अशी आर्जव त्याचे डोळे करत. थोडं त्याला चिडवायला, थोडं आमच्या मनोरंजनाकरता, आम्ही त्याला आमच्या मागे-पुढे, त्याच्या मागच्या २ पायांवर नाचवत असू. कधी खाऊ लपवून त्याला शोधायला लावत असू तर कधी त्याला उडी मारून खाऊ झेलायला लावत असू.

बागेत येणाऱ्या मांजरींचा, राजाला पाठलाग करायला लावणे हा ही आमचा एक आवडता छंद होता. लहान मुलांना जसे कधी-कधी पोलिसांचा धाक दाखवून, मोठे त्यांच्या मनाप्रमाणे वागवतात, तसा, आम्ही ह्या मांजरींचा वापर, राजाला आमच्या मनासारखे करायला लावायचे असले की करायचो. उदा. राजा उगाच जेवताना नखरे करायला लागला की -

मी - "राजा तुला हे इतकं छान जेवण नकोय नं! जा, त्यापेक्षा त्या शेजारच्या शहाण्या मनीला देते हे."
बहिण - (राजाचं जेवण असलेलं वाडगं उचलून बाहेर नेत)"म्यांव, म्यांSSSव"

बहुतेकवेळा आमच्या ह्या अभिनयाला आणि दटावणीला राजा बळी पडायचा; वाडग्यातलं अन्न झटपट फस्त करायचा. पण कधी कधी मात्र आम्हाला हार मानून त्याच्यापुढे हात टेकायची पाळी यायची. राजा हट्टाला पेटला की खरच आमचा अगदी अंत बघायचा. मग कधी बोलणी, कधी धपाटे खायचा. असा प्रसाद मिळाल्यावर, तो इतक्या केविलवाण्या नजरेने बघायचा की माणूस विरघळलंच म्हणून समजा. काही वेळापूर्वी त्याच्या अंगावर ओरडणारी मी मग, "भुभ्या, सोन्या" करत त्याच्या गळ्यात पडायचे. माझ्या बहिणीची तर त्याच्याशी बोलायची एक वेगळीच भाषा होती!

आम्ही बहिणी जरी राजाच्या प्रेमाकरता भांडलो, तरी त्याची आवडती व्यक्ती म्हणजे आमची आजी! गमतीने आम्ही राजाला 'आजीचं शेपूट' असं चिडवायचो. "आपला आणि ह्याचा काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे", असं आजी नेहेमी म्हणायची.

अनेक आजारपणातून तो सावरला, पण शेवटी-शेवटी तो फारच थकला. सांधेदुखीने व दम्याने त्याचे जिणे नकोसे केले. आम्हाला त्याच्या यातना बघवेनात. अखेर मनावर दगड ठेवून, आम्ही त्याला निरोप द्यायचा निर्णय घेतला. आजही राजा म्हटलं की त्याची विविध लोभसवाणी रूपं डोळ्यासमोर तरळतात. टपोऱ्या, चमकदार डोळ्यांतून संवाद साधणारा राजा, हर्षवायू झाल्यागत शेपटी हालवून माणसाचे स्वागत करणारा राजा, झोपेतून उठल्यावर आळस देणारा राजा, पुढचे पाय पुढे आणि मागचे पाय मागे पसरून ऐटीत बसणारा राजा.

१२-१३ वर्षाच्या सहवासात राजाने आम्हाला भरभरून प्रेम दिले आणि आठवणीच्या कप्प्यात जपून ठेवावे असे कितीतरी सोनेरी क्षण. आज वर्ष झालं त्याला जाऊन, तरी, अजूनही, एखाद्या संध्याकाळी थकून-भागून घरी परतताना असं वाटतं की, धावत, शेपटी हालवत, गोंड्या फाटकाशी येईल!