Tuesday, September 04, 2007

फिटे अंधाराचे जाळे


प्रत्येक गाण्याचा साज-बाज वेगळा आणि त्यामुळेच प्रत्येक गाणं मनात वेगवेगळे भावतरंग उमटवते. काही गाणी ऐकताक्षणीच आपल्याला वेड लावतात, तर काहींचा रंग ती वारंवार ऐकल्यावरच चढतो. काही गाणी काळाच्या वेढ्यात असतात; एकेकाळी जणू आपण त्याच्या प्रेमात असतो, पण पुन्हा कधी ते कानी पडलं तर प्रश्न पडतो - 'काय पाहिलं ह्याच्यात?'. काही गाण्यांची गोडी मात्र काळा-वेळाच्या पलीकडची असते. काही गाणी आपल्याला त्यांचाच छंद लावतात; एकदा ऐकून समाधानच होत नाही, लागोपाठ पारायणं करायला लावतात.

आनंदी गाणी मनातल्या पाखराला फुलवतात तर विरह गीतं आपल्याला आर्ततेच्या गर्तेत लोटतात. काही गाण्यांमधे आपल्यात नवीन उमेद निर्माण करायची ताकद असते तर काही आपल्याला तल्लीन करून परब्रम्हाचं दर्शन घडवितात....अशी गंमत आहे गाण्यांची.

बऱ्याच वेळा गाणं सुरू असतं, अगदी आपण ठेका ही धरलेला असतो, पण शब्द मनात रुजायच्या आधीच विरून जातात. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं असं. पुन्हा एखाद्या निवांत क्षणी तेच गाणं लक्षपूर्वक ऐकलं की मनात विचार येतो - "अरे! इतकं सुंदर गाणं....असं कसं दुर्लक्षित राहिलं आपल्याकडून?" परवा संध्याकाळी अगदी अस्संच झालं. संध्याकाळची वेळ होती आणि मी घरी निघाले होते, गाडीत रेडिओ सुरु होता. 'फिटे अंधाराचे जाळे...' हे गाणं लागलं. तसं माहितीतलं गाणं, नेहेमी कानावर पडणारं. पण त्यादिवशी ते लक्षपूर्वक ऐकल्यागेलं आणि त्यातल्या काव्याच्या प्रेमातच पडले मी.

सूर्योदय - अनादि काळापासून, न चुकता रोज घडणारी निसर्गातली घटना. म्हटलं तर रोजचीच, म्हटलं तर नवलाईची, अपूर्वाईची आणि महत्त्वाची सुद्धा! आपल्या विश्वाचे अस्तित्व सूर्यनारायणाच्या कृपेमुळेच आहे, नाही का?

सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय. कवीने म्हटल्याप्रमाणे सूर्योदय नेहेमीच नवीन आशा, नवीन उत्साह घेऊन येतो. हा उत्साह, हा उल्हास मानवी मनापुरताच मर्यादित नसतो तर तो आपल्या भोवतीच्या सृष्टीतही आपल्याला जाणवतो - उजाडताच टवटवीत होणाऱ्या हिरवाईतून, किलबिलणाऱ्या पक्षांमधे. उगवणारा हा आगीचा गोळा जणू आपल्याला सांगत असतो - "मित्रा, गेला दिवस विसरून जा...कुढत बसू नकोस, रडू नकोस...हा घे एक नवीन दिवस...नव्याने सुरुवात कर आणि मस्त जग!"

पण सूर्योदय मनात जे भाव जागवतो ते सूर्यास्ताला नाहीच जमत. सूर्यास्त घेऊन येतो एक उदासवाणी हुरहुर, काळजी; दिसत नसलेल्या उद्याची. रात्री दर्शन देणारा चांदोबा आणि चांदण्याची मजा काही निराळीच. लहान मुलांना जिव्हाळ्याचा वाटणारा चंद्र - चंदामामा, त्यांच्या बालमनाला साद घालणाऱ्या लुकलुकणाऱ्या चांदण्या. तरुणांच्या मनात प्रेमाची कारंजी नाचवणारे ही हेच चंद्र-तारका.

सूर्योदयाबद्दल बोलताच, कौसानीच्या सूर्योदयाचे विलोभनीय चित्र डोळ्यासमोर तरळून जाते. आदल्या दिवशीच्या संध्याकाळी ढगांमुळे सूर्यास्त बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, सूर्योदयाकरता भल्या पहाटे गजर लावून धडपडत उठलो होतो आम्ही. उजाडायची चाहुल लागल्यामुळे पक्षीजगतात जाग झाली होती. आमच्या खोलीच्या बाल्कनीतून हिमाराजींची रूपरेषा दिसत होती - त्रिशुळ, नंदाघंटी, पंचचुली...अशी काही शिखरांची नावं आम्हाला नंतर कळाली. ह्ळूच सूर्याची किरणं एकेका शिखराला प्रकाशून आमच्यासमोर आणत होती. बघताबघता काळोखाची जागा उजेडानी घेतली. पर्वतांवर सोन्याचा मुलामा चढविला आहे असे वाटत होते. आकाशात पिवळ्या-लाल-केशरी रंगांची जणू उधळण झाली होती. असं मनात कायम कोरल्या गेलं आहे हे सूर्योदयाचे चित्र...

असो...सूर्योदयाचे वर्णन करणारं एक गाणं मला कुठल्याकुठे घेऊन गेलं पहा!....


कौसानीचा सूर्योदय

Monday, June 25, 2007

हौसेला मोल नाही



शिंपी आणि सोनार, ह्या समस्त महिलावर्गाचा छळ करायला अस्तित्वात आलेल्या जमाती आहेत, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आत्तापर्यंत माझा हा समज शिंप्यांपुरता मर्यादित होता. परंतू नुकतेच आलेल्या अनुभवांमुळे, सोनारही त्याच माळेतील मणी आहेत, असे मी बिनदिक्कतपणे म्हणीन. 'Promises are meant to be broken' ह्या उक्तीप्रमाणेच, दिलेला वायदा कधीच पाळायचा नसतो, हे ह्या जमातीचे ब्रीद आहे की काय असे मला वाटायला लागले आहे.

शिवायला टाकलेला कपडा असो, किंवा, हौसेने करायला टाकलेला दागिना; कधी एकदा वस्तू आपल्या हातात पडत्ये ह्याची आम्हाला उत्कंठा लागलेली असते. लहान-सहान गोष्टींतून आनंद घेणाऱ्या आम्ही बापड्या. मनातल्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळेपर्यंत, स्वप्नरंजनातूनच त्याचा कोण आनंद घेत असतो. पण ह्या मंडळींना हे कळेल तर शपथ! गिऱ्हाईकांना हेलपाटे घालायला लावणे, (कधी निर्विकारपणे, तर कधी उद्धटपणे बोलून) त्यांना मनस्ताप देणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा आविर्भावात ही मंडळी वावरत असतात. तशा आमच्या अपेक्षा काही फार नसतात हो! नुसत्या सौजन्यपूर्ण वागण्यानेही आम्हाला वश करता येईल, हे कोणी ह्या मंडळींना सांगेल काय? (खरंतर हेलपाटे मारायला लावून ही मंडळी आमच्यावर उपकारच करतात आणि त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत; आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत कुठलीही हालचाल व्यायामाला हातभारच लावते नाही का?)

'गिऱ्हाईक आमचा देव', हा विचार, भिंतीवर चिकटवलेल्या वचनाप्रमाणे ह्या मंडळींनी आपल्या वागण्या-बोलण्यात अंगीकारला तर किती बरे होईल! गिऱ्हाईकांशी सुसंवाद साधून, त्यांच्या मनातले जाणून घेऊन, जर ह्या मंडळींनी कार्य हातात घेतले, तर त्यांना समाधानी गिऱ्हाईक लाभतीलच, शिवाय, उभयतांचा, चुका दुरुस्तीकरणात खर्च होणारा अनावश्यक वेळही वाचेल. असो...माझ्या ह्या प्रेमळ सुचना कोणी माझ्या मित्रांपर्यंत पोचवेल तर फार बरे होईल. तोपर्यंत 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणत हा छळ सहन करत रहाण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते!

टीप: माझी मतं ही सर्वस्वी माझीच असून, ती पूर्णतः 'पुणेरी' अनुभवांवर आधारित आहेत. तुमच्यापैकी कोणाला ह्याहून वेगळे अनुभव आले असल्यास अवश्य कळवा.

Friday, May 18, 2007

अंगठी


काही केल्या बोटातून अंगठी निघतच नव्हती. नुकतंच झोपेतून उठल्यामुळे तिच्या हाताची बोटं किंचित सुजली होती. नेमकी अंगठीच्या जागी एक पुळी आली होती आणि त्यामुळे कधी एकदा अंगठी काढीन असं तिला झाले होतं. वर्ष झालं होतं तिला ती अंगठी घालायला; त्यांच्या घरच्या ज्योतिषीबुवांनीच सांगितली होती तिला पुष्कराजाची अंगठी घालायला. "अंगठी करून घाला; सगळं सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल." त्यांचं हे वाक्य ऐकताच तिचे बाबा तिला सोनाराकडे घेऊन गेले होते. खरतर तिला पहिल्या बोटात अंगठी घालायला मुळीच आवडत नसे; पण बाबांसमोर इलाज नव्हता! सोन्याच्या भावाने ज्या दिवशी उच्चांक गाठला होता त्याच दिवशी त्यांची अंगठीची खरेदी झाली होती. खडा ही चांगलाच घेतला होता. "आता दुनियेतली कुठलीही ताकद माझं बिघडवू शकत नाही," ती बाबांची चेष्टा करायची. आणि खरंच ६ महिन्यात आयुष्याची गाडी व्यवस्थित मार्गी लागली होती. पण काही केल्या बोटातून अंगठी मात्र निघत नव्हती.......

Sunday, April 15, 2007

नाळ

मृण्मयीला जाग आली तेव्हा उजाडूही लागलं नव्हतं. डोळे मिटून, पांघरूणात गुरफटून घेऊन तिने झोपण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण झोप गेली ती गेलीच. शेवटी ती पलंगावर उठून बसली आणि बाहेरचा कानोसा घेऊ लागली. त्यांच्या घराभोवतालच्या परिसरात भरपूर वनराई होती. साहजिकच अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा तिथे वास होता. माणसं जरी पहाटेच्या साखरझोपेत गुरफटली होती तरी पक्षीजगतात मात्र जाग झाली होती.


पक्ष्यांचा ह्या प्रातः संमेलनामुळे पहाट प्रसन्न वाटत होती. मृण्मयी खिडकीपाशी गेली आणि जरावेळ ह्या मैफिलीत रमली. खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याबरोबर मृण्मयीला फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध जाणवला. तेवढ्यात आंब्यावरच्या कोकिळेने "कु ऊS उ" अशी साद दिली. मृण्मयीने गंमत म्हणून तिला प्रतिसाद दिला. थोडावेळ हा खेळ चालला. मृण्मयी स्वतःशीच हसली...


आकाशशी लग्न ठरल्यापासून मृण्मयी आनंदात होती. कसं एका क्षणात सगळं चित्र बदललं होतं. तिच्या विश्वाची व्याप्ती वाढली होती आणि इथून पुढे वाढणारच होती. लग्नाला तसा बराच अवकाश होता. लग्नानंतर मात्र ती तिच्या मातीपासून-माणसांपासून दूर-दूर जाणार होती. आता इथला प्रत्येक क्षण अनमोल होता आणि येणारी प्रत्येक अनुभुति मनाच्या खजिन्यात जपून ठेवावी अशी...


मृण्मयीने मनातल्या मनात यादीच केली...

  • बागेतल्या झाडांशी गप्पा मारणे...
  • पहाटे उठून पक्षी संमेलनाला हजेरी लावणे...
  • आजोबांबरोबर फिरायला जाणे...
  • आजीच्या कुशीत विसावणे...
  • भावंडांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर दंगा करणे...
  • आंब्याच्या मोहराचा, जाई-जुई-चाफा-मोगरा-रातराणीच्या गंधाचा भरभरून आस्वाद घेणे...
  • आई-बाबा नको नको म्हणाले तरीही रात्री त्यांचे पाय चेपून देणे...
  • उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत, गप्पा मारत झोपेच्या आधीन होणे...
  • संध्याकाळीच्या वारं अंगावर घेत तळ्याकाठी सुर्यास्त बघायला जाणे...
  • मनसोक्त खादडणे...
  • पावसात भिजणे...
  • गौरी-गणापतीच्या आरतीत रमणे...
  • हिवाळ्यात शेकोटीभोवती कोंडाळे करून गप्पा झोडणे...
  • घासाघीस करत खरेद्या करणे...


"हे काय मीनू, आज इतक्या लवकर उठून बसलीयेस", आईच्या आवाजाने मृण्मयी भानावर आली.


"काही नाही गं, असंच" मृण्मयी म्हणाली खरी, पण तिचे पाणावलेले टपोरे डोळे आईच्या सुक्ष्म नजरेतून सुटले नाहीत...

Saturday, March 03, 2007

त्रिवेणी


नंदनमुळे माझी 'त्रिवेणी' ह्या काव्यप्रकाराशी ओळख झाली. गुलझारांच्या त्रिवेणी ह्या काव्यसंग्रहाचा शांता शेळकेंनी केलेला अनुवाद वाचनात आला. गुलझारांची त्रिवेणीची संकल्पना मला फारच आवडली. अवघ्या दोन वाक्यात एखादा विचार मांडायचा आणि तिसऱ्या ओळीत त्या विचाराला वेगळे वळण द्यायचे किंवा त्याच विचाराला अधिक ठासवायचे - मला हे आव्हानात्मक वाटले. पहिली त्रिवेणी लिहिली आणि मग त्याचा छंदच लागला.


मला सुचलेल्या काही त्रिवेण्या तुमच्यापुढे मांडत आहे. त्या कितपत त्रिवेणीचे कायदे पाळतात हे तुम्हीच ठरवा आणि मला नक्की कळवा.


नको माणसांचा गोंगाट, वाहनांची वर्दळ...
मला शांतता हवी आहे.
पण मनातला दंगा शांत होईल तर शपथ!

~~~
"सुख देऊ का दुःख?" मला देवाने विचारले.
"अर्थातच सुख" मी चटकन म्हणाले.
दुःखामुळे सर्जनशीलता बहरणार असेल तर मी तेही सोसेन.

~~~
पैसा, प्रकृती, प्रेम, सौंदर्य, बुध्दी...
बरच लागतं हो जगायला!
मला मात्र स्वास्थ्य आणि माझा ध्यास पुरेसा आहे...

~~~
इ-युगातल्या लोकांचं भाग्य थोर,
संपर्काच्या, संवादाच्या सोयी अनेक.
आपल्याच माणसांपासून दूर जाणं हे ही त्यांचच नशीब!

~~~
प्रेम, राग, दया, असहायता, कृतज्ञता...अनेक भावना दाटतात जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करते.
तुला काय वाटत असेल माझ्याबद्दल?
टाळी एका हाताने थोडीच वाजते!

~~~
एखाद्याला समजून घेणे कठीण,
स्वतःच्या अपेक्षा त्याच्यावर न लादणे हे ही अवघड.
प्रत्येकजण असतो आरूढ आपल्याच ध्रुवावर!

~~~
एकमेकांशिवाय जगता न येणे हे खरं प्रेम?
का एकमेकांबरोबर आनंदाने जगता येणे हे खरं प्रेम?
प्रेमातही श्वास घ्यायला जागा हवीच की!

~~~
कधी कधी शब्दांनी व्यक्त होतं,
कधी डोळे बोलून जातात.
आपल्या नात्याला लाभलेली मनकवडेपणाची झालर मला सर्वात प्रिय आहे.

~~~
"मी तुझी आहे. मीही तुझाच आहे".
ते रोज एकमेकांना सांगत.
आजकाल प्रेमाची बेडी अडकविण्याच्या विरोधात तेच प्रचार करतात.

~~~
तो तिचा सुर्य होताच.
"तू माझी चंद्रकला होशील का?" तिच्या मनातलेच त्याने विचारले.
चंद्रावरच्या डागांच्या विचाराने तिचा होकार मात्र मनातच राहिला.

~~~
तुम 'क्यों' के पीछे पड़े हो,
मुझे 'क्यों' की पर्वा नही हैं...
कंबख्त दिल तो 'क्यों' जानकर भी बेहेकेगा!

~~~
तुमपे हक्क जताए भी कैसे,
ना तुम अपने हो ना हो पराये...
हम तो समझते हैं, पर दिल-ए-नादाँ...उसे कौन समझाए?


दुवे

Friday, February 16, 2007

दुधावरची साय

पिल्लांसाठी जीव तिचा झटत ऱ्हाय,
प्रेमापोटी ताठ ती उभी ऱ्हाय,
तिच्या मायेची पाखर घटत न्हाय,
दुधावरची साय, माझी बाय...

सुगरण बाय आमची हुश्शार हाय,
जगभराचं ज्ञान तिच्या पोतडीत हाय,
देव तिचा देवळात नसून कामात हाय,
दुधावरची साय, माझी बाय...

तरण्यांना लाजवील अशी उमदी माझी बाय,
दाग-दागिन्यांचा सोस नाही, नाविन्याचा हाय,
तिखट-गोड अशी तिची माय,
दुधावरची साय, माझी बाय...

Saturday, January 13, 2007

जुनं ते...


"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं"

रेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....

आता आमच्याच घरात बघा ना, प्रत्येक गोष्टीला आपला असा इतिहास आहे. अगदी वाटी-चमच्यापासून ते fridge, dining table पर्यंत. Dining table आई-बाबांच्या लग्नानंतरचं, तर fridge माझ्या पहिल्या वाढदिवसाचा. पलंग-कपाटं २० वर्षांपूर्वी नवीत घरात घेतलेली. प्रत्येक वस्तूने आपआपले काम चोख बजावले आहे, इतके, की घरातील प्रत्येक व्यक्तीचे ह्या वस्तूंवर आपआपल्या परीने भावबंध जुळले आहेत.

नाविन्याचा आणि सौंदर्याचा (थोड्याफार प्रमाणात का होईना) ध्यास असलेल्या आम्हाला, कधी-कधी, 'पूरे घर के बदल डालूँगा' अशी हुक्की येते. बदलाचे वारे घरात वाहू लागते.

"कशाला, सध्या काम भागतय ना? शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल??" - इति मातोश्री"
सध्या आहे ते इतकंही वाईट नाहीये, नाही का? उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं!" - आमच्या मनातला बारिक आवाज.

असं झालं की आमचं बदलाचं आवसान गळून पडतं आणि नेहेमीच्या सरावलेल्या वातावरणात आम्ही पुन्हा स्थिरस्थावर होतो.

'जुनं ते सोनं' किंवा 'झिजेपर्यंत वापरा'चे नकळत आमच्यावरही संस्कार झाले आहेत. तरीही चेष्टा-मस्करी करताना आम्ही मातोश्रींना ह्यावरून भरपूर हसतो. पण ह्याबद्दल खोलवर विचार केला की जाणवतं की दोष व्यक्तीचा नाहीये. तो काळच तसा होता, अभावाचा - पैशाच्या अभावाचा, बाजाराच्या अभावाचा, ई. त्यामुळे आहे त्यात निभावण्याची मनाला आपोआपच सवय लागली असावी. अभिरूची, सौंदर्यदृष्टी असल्या संकल्पना ही तेव्हा अस्तित्वात नव्हत्या.

पण आता जमाना बदलला आहे. आजचा काळ आहे सुबत्तेचा, सहज मिळणाऱ्या पैशाचा, सुखसोयींचा. 'पैशाचं काय करायचं' हा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे आणि 'खरेदी', हे बहुतांश लोकांना सापडलेलं सहज, सोप्पं उत्तर आहे. अनेक (नको असलेल्या?) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच?) महत्त्व प्राप्त झाले आहे.

असो. काय योग्य, काय अयोग्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे....तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? अवश्य कळवा...

Thursday, January 04, 2007

फिदा

यंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर करतात. ह्या वर्षीचा महोत्सव कुणामुळे लक्षात राहील, असा प्रश्न मला कोणी विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं - 'कौशिकी चक्रवर्ती'.

कार्यालयातून थेट कार्यक्रमाला जायचं, मध्यरात्रीनंतर कधीतरी घरी पोचायचं की परत सकाळी लवकर कामावर हजर; असा काहीसा कार्यक्रमाच्या दिवसात माझा परिपाठ होता. महोत्सवाचा दुसरा दिवस होता. शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनानंतर, पोट, बाहेरच्या खाण्या-पिण्याच्या stallsकडे खुणावू लागलं. पटकन पोटोबा उरकावा आणि हात-पायही मोकळे करावेत ह्या हेतूने मी बाहेर पडले. नंतरचे गाणे कौशिकी चक्रवर्तींचे होते. कौशिकी, ह्या पं अजय चक्रवर्तींच्या कन्या व शिष्या, ह्या पलिकडे, मला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नव्हती......

सवाई गंधर्वला येणारे बहुतांश रसिकगण खवैयेही असावेत असे मला वाटते - जितकी गाण्याला तितकीच खाण्यालाही गर्दी असते! गर्दीतून वाट काढत कशी-बशी stallsपाशी पोचले. हवा तो पदार्थ मागवून मिळेपर्यंत आणि खाण्याकरता त्यातल्यात्यात निवांत कोपरा शोधण्यात थोडासा वेळ गेलाच. गर्दी असूनही ओळखीचे कोणीनाकोणीतरी भेटत गेले आणि नाही म्हटलं तरी च्याऊ-म्याऊचा आमचा फेरफटका लांबला. तेवढ्यात स्वरमंडपातून बहारदार ताना ऐकू येऊ लागल्या आणि त्याला मिळणारी रसिकांची मनमोकळी दादही. आता मात्र मला बाहेर थांबल्याचे थोडेसे अपराधीच वाटू लागले.

लगबगीने स्वरमंडपात पोचले तेव्हा राग रागेश्रीमधील 'मेरो मन हरवा...' ही बंदिश रंगात आली होती. गोल-गुबगुबीत चेहेरा, बंगप्रांतीय मुलींप्रमाणे नितळ-उजळ कांती, काजळ घातलेले विलक्षण बोलके डोळे आणि अतिशय लोभसवाणे स्मितहास्य - कौशिकींनी माझ्या ह्रदयात तत्काळ जागा मिळवली.

राग रागेश्रीनंतर कौशिकींनी एक सुरेख ठुमरी सादर केली - 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे.." कुठलीही कला सादर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराची तयारी. परंतू जोपर्यंत त्या सादरीकरणात भाव उतरत नाही तोपर्यंत, ते सादरीकरण अपूर्णच, असे मला वाटते. शास्त्रीय संगीत, सामान्य माणसाला रुचेल अशा पद्ध्तीने सादर केले जात नाही असा बऱ्याच जणांचा आरोप असतो आणि तो मला काही अंशी पटतो देखील. कौशिकींचे गाणे मात्र थेट रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचत होते एवढे नक्की! त्यांचा आवाज, गाण्यात उतरणारा भाव आणि नजाकत, रसिकांवर अशी मोहिनी घालत होती की नकळत प्रेक्षकातील प्रत्येकाच्या मुखातून 'वाSSहSवा'ची बरसात होत होती.

कौशिकी जेव्हा गाणं संपवून उठल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून, टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.

आज पुन्हा कौशिकींच्या स्वरगंगेत न्हायचा योग आला. बिहाग, मालकंस आणि त्यांनी पेश केलेल्या इतर नजराण्यांच्या धुंदीतच वावरत्ये मी!