Showing posts with label आमचे अनुभव. Show all posts
Showing posts with label आमचे अनुभव. Show all posts

Monday, June 25, 2007

हौसेला मोल नाही



शिंपी आणि सोनार, ह्या समस्त महिलावर्गाचा छळ करायला अस्तित्वात आलेल्या जमाती आहेत, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आत्तापर्यंत माझा हा समज शिंप्यांपुरता मर्यादित होता. परंतू नुकतेच आलेल्या अनुभवांमुळे, सोनारही त्याच माळेतील मणी आहेत, असे मी बिनदिक्कतपणे म्हणीन. 'Promises are meant to be broken' ह्या उक्तीप्रमाणेच, दिलेला वायदा कधीच पाळायचा नसतो, हे ह्या जमातीचे ब्रीद आहे की काय असे मला वाटायला लागले आहे.

शिवायला टाकलेला कपडा असो, किंवा, हौसेने करायला टाकलेला दागिना; कधी एकदा वस्तू आपल्या हातात पडत्ये ह्याची आम्हाला उत्कंठा लागलेली असते. लहान-सहान गोष्टींतून आनंद घेणाऱ्या आम्ही बापड्या. मनातल्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळेपर्यंत, स्वप्नरंजनातूनच त्याचा कोण आनंद घेत असतो. पण ह्या मंडळींना हे कळेल तर शपथ! गिऱ्हाईकांना हेलपाटे घालायला लावणे, (कधी निर्विकारपणे, तर कधी उद्धटपणे बोलून) त्यांना मनस्ताप देणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा आविर्भावात ही मंडळी वावरत असतात. तशा आमच्या अपेक्षा काही फार नसतात हो! नुसत्या सौजन्यपूर्ण वागण्यानेही आम्हाला वश करता येईल, हे कोणी ह्या मंडळींना सांगेल काय? (खरंतर हेलपाटे मारायला लावून ही मंडळी आमच्यावर उपकारच करतात आणि त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत; आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत कुठलीही हालचाल व्यायामाला हातभारच लावते नाही का?)

'गिऱ्हाईक आमचा देव', हा विचार, भिंतीवर चिकटवलेल्या वचनाप्रमाणे ह्या मंडळींनी आपल्या वागण्या-बोलण्यात अंगीकारला तर किती बरे होईल! गिऱ्हाईकांशी सुसंवाद साधून, त्यांच्या मनातले जाणून घेऊन, जर ह्या मंडळींनी कार्य हातात घेतले, तर त्यांना समाधानी गिऱ्हाईक लाभतीलच, शिवाय, उभयतांचा, चुका दुरुस्तीकरणात खर्च होणारा अनावश्यक वेळही वाचेल. असो...माझ्या ह्या प्रेमळ सुचना कोणी माझ्या मित्रांपर्यंत पोचवेल तर फार बरे होईल. तोपर्यंत 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणत हा छळ सहन करत रहाण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते!

टीप: माझी मतं ही सर्वस्वी माझीच असून, ती पूर्णतः 'पुणेरी' अनुभवांवर आधारित आहेत. तुमच्यापैकी कोणाला ह्याहून वेगळे अनुभव आले असल्यास अवश्य कळवा.

Thursday, January 04, 2007

फिदा

यंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर करतात. ह्या वर्षीचा महोत्सव कुणामुळे लक्षात राहील, असा प्रश्न मला कोणी विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं - 'कौशिकी चक्रवर्ती'.

कार्यालयातून थेट कार्यक्रमाला जायचं, मध्यरात्रीनंतर कधीतरी घरी पोचायचं की परत सकाळी लवकर कामावर हजर; असा काहीसा कार्यक्रमाच्या दिवसात माझा परिपाठ होता. महोत्सवाचा दुसरा दिवस होता. शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनानंतर, पोट, बाहेरच्या खाण्या-पिण्याच्या stallsकडे खुणावू लागलं. पटकन पोटोबा उरकावा आणि हात-पायही मोकळे करावेत ह्या हेतूने मी बाहेर पडले. नंतरचे गाणे कौशिकी चक्रवर्तींचे होते. कौशिकी, ह्या पं अजय चक्रवर्तींच्या कन्या व शिष्या, ह्या पलिकडे, मला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नव्हती......

सवाई गंधर्वला येणारे बहुतांश रसिकगण खवैयेही असावेत असे मला वाटते - जितकी गाण्याला तितकीच खाण्यालाही गर्दी असते! गर्दीतून वाट काढत कशी-बशी stallsपाशी पोचले. हवा तो पदार्थ मागवून मिळेपर्यंत आणि खाण्याकरता त्यातल्यात्यात निवांत कोपरा शोधण्यात थोडासा वेळ गेलाच. गर्दी असूनही ओळखीचे कोणीनाकोणीतरी भेटत गेले आणि नाही म्हटलं तरी च्याऊ-म्याऊचा आमचा फेरफटका लांबला. तेवढ्यात स्वरमंडपातून बहारदार ताना ऐकू येऊ लागल्या आणि त्याला मिळणारी रसिकांची मनमोकळी दादही. आता मात्र मला बाहेर थांबल्याचे थोडेसे अपराधीच वाटू लागले.

लगबगीने स्वरमंडपात पोचले तेव्हा राग रागेश्रीमधील 'मेरो मन हरवा...' ही बंदिश रंगात आली होती. गोल-गुबगुबीत चेहेरा, बंगप्रांतीय मुलींप्रमाणे नितळ-उजळ कांती, काजळ घातलेले विलक्षण बोलके डोळे आणि अतिशय लोभसवाणे स्मितहास्य - कौशिकींनी माझ्या ह्रदयात तत्काळ जागा मिळवली.

राग रागेश्रीनंतर कौशिकींनी एक सुरेख ठुमरी सादर केली - 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे.." कुठलीही कला सादर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराची तयारी. परंतू जोपर्यंत त्या सादरीकरणात भाव उतरत नाही तोपर्यंत, ते सादरीकरण अपूर्णच, असे मला वाटते. शास्त्रीय संगीत, सामान्य माणसाला रुचेल अशा पद्ध्तीने सादर केले जात नाही असा बऱ्याच जणांचा आरोप असतो आणि तो मला काही अंशी पटतो देखील. कौशिकींचे गाणे मात्र थेट रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचत होते एवढे नक्की! त्यांचा आवाज, गाण्यात उतरणारा भाव आणि नजाकत, रसिकांवर अशी मोहिनी घालत होती की नकळत प्रेक्षकातील प्रत्येकाच्या मुखातून 'वाSSहSवा'ची बरसात होत होती.

कौशिकी जेव्हा गाणं संपवून उठल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून, टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.

आज पुन्हा कौशिकींच्या स्वरगंगेत न्हायचा योग आला. बिहाग, मालकंस आणि त्यांनी पेश केलेल्या इतर नजराण्यांच्या धुंदीतच वावरत्ये मी!

Saturday, February 11, 2006

(आमच्यातल्या) खेळाडूला जेव्हा जाग येते...

(शीर्षक 'रायगडाला जेव्हा जाग येते'च्या धर्तीवर)....

(भारतात) हिवाळा म्हटलं की हुर्डा पाटर्या, शेकोटया, सकाळचं धुकं, स्वेटर-कानटोप्या घालून बाहेर पडणारी माणसं, अशी चित्रं डोळ्यासमोर सहज उभी रहातात. तसच हिवाळा म्हटलं की शाळा-कॉलेज-ऑफिसातली स्नेहसंमेलनं आणि क्रीडास्पर्धासुद्धा! तर अशाच क्रीडास्पर्धेची वार्ता ऑफिसच्या email द्वारे आमच्यापर्यंत पोचली. Badminton, TT, Cricket अशा ३ खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार होत्या. तिन्ही खेळात सरस ठरणारा संघ क्रीडा-चषकाचा मानकरी ठरणार असे आम्हाला कळले.

एकतर असे स्पर्धात्मक खेळ आम्ही कधी खेळलोच नाही, (त्यामुळे आमच्यात ती स्पर्धात्मक वृती, जिंकण्याची ईर्षा, वगैरे वगैरे नाही! नाहीतर एव्हाना कुठल्याकुठे पोचलो असतो. असो.....हा नाजूक विषय पुढच्या एखाद्या नोंदीत विस्ताराने मांडेन) त्यात स्वभाव भित्रट. त्यामुळे Cricket सारखे अंगाशी येणारे खेळ आमच्या क्षमतेच्या पलिकडले होय. त्यातल्यात्यात घरासमोरच्या गल्लीत Badminton खेळलो होतो. Badminton खेळायला आवडायचं आणि मुख्य म्हणजे ते बऱ्यापैकी जमायचं (म्हणजे माझ्याकडे टाकलेले फूल मला व्यवस्थित परतवता यायचे). त्यामुळे Badminton करता नाव द्यायला हरकत नाही असा विचार सहजच मनात आला. शुभस्य-शीघरम्, असा विचार करत, मी आणि माझ्या एका मैत्रिणीने लागलीच आमची नावं एकेरी व दुहेरी सामन्यांकरता दिली.

गल्लीत Badminton खेळणं वेगळं आणि court वर खेळणं वेगळं, ह्याची आम्हाला जाणीव होती. उगाच स्पर्धेच्यावेळी फजिती नको, म्हणून आम्ही सुट्टीच्यावारी court वर जाऊन सराव करायचा निश्चय केला. तसा आमच्याजवळ महिना होता. एवढया कालावधीत आम्ही बऱ्यापैकी खेळायला लागू असा (उगाच भाबडा?) विश्वास आम्हाला वाटत होता. मग काय, लागलीच शनिवारी जय्यत तयारीनिशी (= tracks, sneakers, professional खेळाडूंसारखी racket, bag, त्यात पाण्याची बाटली, खाऊचा डब्बा, towel...) आम्ही court वर हजर झालो. रगडून सराव करायचा, कुठेही प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत, ह्या अनुषंगाने आम्ही विचार करत होतो. court वर पोचतो तर काय, तिथे आमच्यासारख्या सराव-इच्छुक मंडळींची ही गर्दी! थोडयावेळाने आमचा नंबर लागला. आम्ही तिथल्या मुलांपैकीच दोघांना, आम्हाला नियम समजावून सांगायची व आमच्याबरोबर खेळायची विनंती केली.

सुरूवातीच्या आमच्या खेळाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -

  • प्रतिस्पर्ध्याच्या हातात फूल देणे.
  • हमखास ठराविक चौकोनाच्या बाहेर service करणे.
  • फूल परतवताना अंदाज चुकणे; फूल एकतर आमच्या हद्दीत पडायचे किंवा प्रतिस्पर्ध्याच्या हद्दीबाहेर.

हळूहळू, आमच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनामुळे, आमच्या खेळात सुधारणा होऊ लागली; खेळाचे तंत्र आत्मसात होऊ लागले. आमचे सहकारी पट्टीचे खेळणारे होते. त्यांच्यापुढे आमचा खेळ फिक्काच पडायचा. तरीही आम्ही निराश न होता, मन लावून, (जमेल तसे सरावाच्या नावाखाली ऑफिसातून पळ काढून :) ) सराव करत होतो. आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, (आहेत तरी का?!) कसे आहेत, ह्याची आम्हाला काडीमात्र कल्पना नव्ह्ती.

अखेर आमच्या सामन्याच्या वेळा जाहीर झाल्या. आमच्या संघाला ८ गुण मिळवून देणे आमच्या हातात होते. म्हटलं तर सोप्पं होतं; आम्हाला एकच स्पर्धक संघ होता. ;) आमच्या संघाच्या आमच्या बाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ह्या अपेक्षांचे ओझे, 'आपण-इतका-सराव-करूनही-हरलो-तर', ह्या नामुष्कीचे दडपण अशी आमची मानसिक स्थिती होती. आपला खेळ आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस आहे हे मनाच्या एका कोपऱ्यात होते; पण 'उगाच फाजील आत्मविश्वास नको', असे आम्ही स्वतःला बजावत होतो!

स्पर्धेची सकाळ उगवली. थोडेसे दडपण, थोडासा आत्मविश्वास, थोडसं "विजय-पराजयाचा विचार सोडून देऊ, जे होईल ते होईल, आपण निव्वळ खेळातला आनंद लुटुया" अशी काहीशी आमची मनस्थिती होती. आम्हाला प्रोत्साहन द्यायला, आमचे सहकारी, संघातील इतर खेळाडू हजर होते. दुहेरी सामना आम्ही सहज जिंकला. ह्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. एकेरी सामने जरा चुरशीचे झाले, तरीही, माझी मैत्रिण विजेती तर मी उपविजेती ठरले. आता क्रीडा-चषक आमचाच होता! मग काय सर्वत्र आमचाच जयघोष होता.

आमच्या आयुष्यातला हा पहिला चषक (तो ही क्रीडा स्पर्धेत जिंकलेला!). आम्हाला त्याचे कोण अप्रुप!........काय हसताय...."मटका लागला" म्हणताय! अहो, पुढच्या वर्षीपर्यंत थांबा. आमच्यामधील जागृत झालेला खेळाडू, पुढच्या वर्षीचीही स्पर्धा गाजवणार!

Friday, January 06, 2006

मी अनुभवलेले कोकण

नवीन वर्षाची सुरूवात मी, माझ्या घरच्यांबरोबर कोकणच्या सफरीने केली. ५ दिवसांच्या आमच्या सफरीत आम्ही दिवेआगर, हरिहरेश्वर, जंजीऱ्याचा किल्ला आणि गुहागर ह्या ठिकाणांना भेट दिली. कोकण पिंजून काढायचा म्हटलं तर किमान १५ दिवस हाताशी असावेत असे मला वाटते. असो. ५ दिवस पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात व पूर्णवेळ घरच्यांसोबत, बाहेच्या जगाशी मर्यादित संपर्क - हे ही नसे थोडके!

मी अनुभवलेले कोकण इथे तुमच्यासमोर मांडत आहे; सोबत काही छायाचित्रही जोडत आहे.

१. कोकणचे नजारे














  • उतरत्या छपरांची जवळ-जवळ वसलेली कौलारू घरे.
  • नारळ-पोफळीच्या वाडया.
  • लाल माती उडवत, घुंगरांचा मंजुळ आवज करत जाणाऱ्या बैलगाडया.
  • घनदाट वनराई; आंबा, फणस, काजूची असंख्य झाडे.
  • लाकडच्या मोळ्या विकायला चाललेल्या बायका.
  • मऊ रेतीचे, दिवसाच्या प्रहराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे भासणारे, कधी चमकणारे समुद्रकिनारे.
  • गावातील नीट-नेटकी घरे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर दिसणाऱ्या छोटया-मोठया पाटया. उदा. "येथे कोकणचा मेवा मिळेल" किंवा "घरगुती रहाण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था"
  • नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेला विस्तीर्ण समुद्र - कधी शांत, कधी अवखळ, तर कधी खवळलेला; सुर्यकिरणांच्या खेळामुळे वेगवेगळ्या वेळी वेगळे भासणारे त्याचे रूप - पांढरे, निळे, हिरवे तर कधी गढूळ!


२. कोकणचे नाद







  • बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या घुंगुरमाळेचा मंजुळ नाद.
  • पहाटे कोंबडयाचे आरवणे.
  • पक्ष्यांचे आवाज.
  • किनाऱ्यावरील पक्षांचा पाठलाग करणाऱ्या, भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या.
  • किनाऱ्यावरील रेतीला लाटांनी चिंब करणारा, खडकांना लाटांनी धपाटे देणाऱ्या समुद्राचा अविरत नाद.
  • मालवाहातूक करणाऱ्या जहाजांच्या, मच्छीमार बोटींच्या मोटारींची धगधग.

३. कोकणचे गंध




  • नुकतेच सारवलेल्या फरशीचा सुगंध.
  • खाडयांचा दर्प.
  • मासळी बाजारातील ताज्या, सुकवलेल्या माश्यांचा वास.
  • पाणी तापविण्यासाठी पेटवलेल्या बंबातून किंवा रात्री पेटवलेल्या शेकोटीतून येणाऱ्या धुराचा गंध.
  • घरगुती खानीवळीतून दरवळणारा गरम-गरम अन्नचा वास.
  • देवळात तेवणाऱ्या समईचा आणि उद-धूपाचा मिश्र सुगंध.

४. कोकणचे स्वाद
  • शहाळ्याचे थंडगार मधुर पाणी, त्यातले कोवळे, लुसलुशीत गोड खोबरे.
  • कोकणचा गोड मेवा - सुकेळी, आंबा पोळी, फणस पोळी.
  • आवळा-कोकमची सरबतं - त्यांची गोड-आंबट-तुरट अशी मिश्र चव.
  • चटकदार पापड लाटया.
  • केळीच्या पानावर वाढलेले, भरपूर ओलं खोबरं घातलेले, साधे, सौम्य जेवण.

५. कोकणचे स्पर्श
  • थंड वाटणारी सारवलेली जमीन.
  • किनाऱ्यावरची मऊ रेती.
  • ओल्या पायांनी अनवाणी चालल्यावर पायाला चिकटणारी, रवाळ लागणारी रेती.
  • किनाऱ्यावरचे काही खडबडीत, काही गुळगुळीत शंख-शिंपले, गोटे.
  • पायांना अवखळपणे हलकेच स्पर्शणारे, अंगावर किंचित शहारा आणणारे समुद्राचे गार पाणी.

Sunday, December 11, 2005

कबुली

काही दिवसांपूर्वी एका संस्थेच्या दशकपूर्ती समारंभाला जाण्याचा योग आला. खाजगीपणा जपण्याकरता
इथे नावाचा उल्लेख करत नाही. संस्थेच्या कार्याची ओळख वृत्तपत्रातील एका लेखामुळे झाली होती.
अभ्यासपूर्ण पदभ्रमण-गिर्यारोहण हे संस्थेचे मुख्य कार्य. परंतू हे करत असताना त्यांनी समाजिक
बांधिलकी ही जपली होती. "नुसताच निसर्गाचा आनंद लुटण्यापेक्षा त्याच निसर्गात रहाणाऱ्या
निसर्गाच्या लेकरांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न का करू नये?" हा कार्यकर्त्यांचा विचार
मला भावला.


गिर्यारोहणाच्या आवडीमुळे आणि संस्थेच्या उपक्रमांमुळे मी सहाजिकच संस्थेकडे आकृष्ट
झाले. त्यांच्याबरोबर पदभ्रमण करायची संधी कधी मिळेल ह्याची मी आतुरतेने वाट पाहू लागले.
अशातच एके दिवशी एका कार्यकर्त्याचा मला फोन आला. "अमुक दिवशी, अमुक ठिकाणी, इतक्या वाजता संस्थेने 'परिचय मेळावा' योजिला आहे. नक्की येण्याचे करावे," असे निमंत्रण मिळाले. संस्थेच्या
कार्याची अधिक माहिती मिळण्याची, कार्यकर्त्यांशी ओळख होण्याची आणि नवीन माणसं जोडायची ही उत्तम संधी होती. मी माझ्या एका मैत्रिणीसोबत तिथे जाण्याचे निश्चित केले.


ठरल्या दिवशी, दिलेल्या वेळेपेक्षा थोडे उशीराच आम्ही दोघी सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. योजलेले ठिकाण पाहूनच मी थोडी निराश झाले. "आजकालचे समारंभ उगाच भपकेबाज असतात! त्यामुळे, आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असणऱ्या गोष्टीला सकृतदर्शनी कमी लेखू नये," असे मी स्वतःला लगेच बजावले. कार्यक्रम सुरु झाला नव्ह्ता हे बघून थोडं हायसं वाटलं.


हॉलमध्ये वीस-एक माणसं जमली होती - स्त्रिया नव्ह्त्याच. ना फार पुढे ना अगदी मागे अशा जागी
जाऊन, मी आणि माझी मैत्रिण बसलो आणि कार्यक्रम सुरु व्हायची वाट पाहू लागलो. आजूबाजूचे निरिक्षण चालूच होते. जमलेली बहुतेक मंडळी पस्तीशीच्या पुढचीच वाटली. प्रमुख पाहुणे म्हणून एका ज्येष्ठ इतिहास संशोधकांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुत्रसंचालकाच्या
बोलण्यावरून कळले की हे संस्थेच्या 'दशकपूर्ती वर्ष' होते. कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेच्या
कार्याचा आढावा घेण्यात आला. आढाव्यानंतर अनौपचारिक ओळखीचा कार्यक्रम झाला.


हे सगळं चालू असताना मनात कुठेतरी "I DON'T FIT HERE" अशी भावना उसळत होती. अधून-मधून "आपण इथे येण्याचा योग्य निर्णय घेतला का?" असा विचारही मनात डोकावत होता. "EVERYTHING APPEARS YELLOW TO THE JAUNDICED EYE" ह्या इंग्रजी उक्तीप्रमाणे कार्यक्रमात मला दोषच दिसु लागले. प्रमुख पाहुण्यांचे भाषण मला जरा जास्तच नाटयपूर्ण वाटले.


मनातील विचारांमुळे मला कार्यक्रमाचा समरसून आनंद घेता येत नव्ह्ता आणि म्हणून स्वतःचा रागही
येत होता. कार्यक्रम अगदी साधा होता, तिथे आलेली माणसं माझ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील
नव्हती - हे त्यांच्या एकंदर बोलण्यावरून, पेहेरावावरून स्पष्ट होते. पण म्हणून मी त्यांचा, ह्या कार्यक्रमाचा अव्हेर का करावा? माणसाच्या कार्यापेक्षा मी त्याच्या राहाणीमानाला जास्त महत्त्व का देत होते? स्वतःकडे उदंड नसतानाही, आपल्यापेक्षा दुर्बल समाजाला मदत करता येते; ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही सर्व मंडळी होती.


तिथे जमलेली माणसं माझ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील असती तर मला ती अधिक भावली असती का? - कदाचित. ह्या उलट जर ते उच्च्भ्रु वर्गातले असते तर त्यांच्याबद्दल, ह्या कार्यक्रमाबद्दल मला
काय वाटले असते? - "त्यांना काय झालयं हे सगळं न जमायला?" का "उगाच स्तोम माजवत आहेत." असे काहीसे विचार त्यावेळच्या परिस्थितीनुसार आले असते, असे वाटते.


असो. मनातील द्वंद्व चालूच होते. शेवटी काहीतरी निमित्त करून मी आणि माझी मैत्रिण तिथून
सटकलो. मनातील विचारांचा हा तिढा सुटेल तेव्हा सुटो. सध्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना एवढेच
म्हणीन, "तुमच्या पदभ्रमणाला आणि कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा! माझ्या कोत्या मनाला क्षमा
करा."

Thursday, November 17, 2005

सर्कस


आमची रोजच सर्कस होते - ५:५५ची ३२५नंची "मासुळकर कॉलनी - पुणे स्टेशन" बस गाठताना. ५:३०च्या टोल्याला आवरा-सावर करुन आम्ही ऑफीसमधून सटकतो आणि बसचा मुख्य थांबा गाठतो. नेमका आमच्या बसचा थांबा कोणता हे आम्हाला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. अनेक खाणा-खुणा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला (थांब्यावर अर्थातच पाटी नाही); नेपाळ्यांच्या टपरीनंतर, सार्वजनिक शौचालयाच्या अगोदर, ई. पण बस चालक रोज ही ना ती खुण बाद करतात!! असो हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. तसे आता सहप्रवाशांचे चेहेरे ओळ्खीचे झाले आहेत, त्यामुळे ओळ्खीचे चेहेरे दिसतील तिथे जाऊन आम्ही मोक्याची जागा पकडतो.

एका हातात डब्याची पिशवी, त्याच खांद्यावर पर्स, दुसऱ्या हातात mobile, पावसाचे दिवस असल्यास, त्याच हातात छत्री असा आमचा एकंदर अवतार असतो. अधनं-मधनं ओढणी सावरत, आमची स्वारी येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनी बघत असते. येणारी बस आपली नाही अस कळलं की एक उसासा टाकून, घडाळ्याकडे बघत, "येईलच इतक्यात" अशी स्वतःची समजूत घालतो. कधी-कधी चालत थांब्याकडे येणारा एखादा प्रवासी मागून येणाऱ्या बसची वार्ता घेऊन येतो.

शेवटी एकदाची बस येताना दिसते. मग थांब्यावरचा प्रत्येकजण 100m शर्यतीतल्या स्पर्धकासारखा "GET-SET-GO" च्या आविर्भावात सज्ज होतो. रांग-बिंग असा काही प्रकारच नसतो. जस-जशी बस हळुहळु थांब्याकडे येते, तस-तसे प्रवासी मनात बांधलेल्या अंदाजानुसार बसकडे धाव घेतात. काहीजण पुढच्या दारातून चढाई करतात, तर काहीजण आपला मोर्चा मागच्या दाराकडे वळवतात. अशी लढाई देऊन मनासारखी जागा मिळवण्यात एक वेगळच आनंद असतो बरं का! म्हणूनच की काय, कधी बसला गर्दी नसेल, तर बस दिसायचाच अवकाश, धावलेच लोक बसकडे!!!

आमची ही सर्कस ड्रायव्हरसाहेब आणि दारात उभे असलेले कंडक्टरसाहेब बघत असतात. मग कधी-कधी ड्रायव्हरसाहेबांना गंमत करायची हुक्की येते. मग ते, बसची दारं पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यासमोर येतील अशा हिशेबाने बस अचूकपणे आणून लावतात (ह्यालाही कौशल्य लागतं हं!). अशावेळी सर्वांना पाय (पादत्राणे, कधी त्यांच्याखाली येणारे अघळ-पघळ jeans, सलवार.....फॅशनच्चे सध्या तशी!) शुचिर्भूत करून बसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसतो. (आपली संस्कृती आपल्यालच जपायला नको का!)

कधी अचानक ह्या सर्कशीच्या खेळात थोडा बदल होतो. हाश-हुश करत आम्ही छान खिडकीची जागा पटकावतो. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या (की धुराच्या??) झुळुकीबरोबर विसावतो आणि मनातल्यामनात स्वतःच्या चपळाईबद्दल स्वतःला शाबासकी देतो. आम्ही आमच्याच जगात असतो आणि अचानक बसमधील मंडळी (जणू बसला आग-बिग लागली की काय) पळू लागतात. आम्हीही जास्त विचार न करता गर्दीमागे पळू लागतो. नशीब जोरात असेल तर कंडक्टरसाहेबांनी हलक्या आवाजात सांगितलेलं "बस फेल आहे, मागच्यात चढा!!" आम्ही ऐकतो आणि वेळीच सावध होतो. कशी-बशी मागच्या बसमधे जागा पटकावतो आणि दुसऱ्या दिवशी सर्कशीचा खेळ खेळायला पुन्हा सज्ज होतो!

प्रत्येक अनुभवाकडे सकारात्मकतेने बघणारे आम्ही मनातल्या मनात विचार करतो - "चला काही का होईना....आपली चपळाई कायम आहे आणि तशीच राहील ह्या रोजच्या सर्कशीमुळे!!"