Sunday, April 15, 2007

नाळ

मृण्मयीला जाग आली तेव्हा उजाडूही लागलं नव्हतं. डोळे मिटून, पांघरूणात गुरफटून घेऊन तिने झोपण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण झोप गेली ती गेलीच. शेवटी ती पलंगावर उठून बसली आणि बाहेरचा कानोसा घेऊ लागली. त्यांच्या घराभोवतालच्या परिसरात भरपूर वनराई होती. साहजिकच अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा तिथे वास होता. माणसं जरी पहाटेच्या साखरझोपेत गुरफटली होती तरी पक्षीजगतात मात्र जाग झाली होती.


पक्ष्यांचा ह्या प्रातः संमेलनामुळे पहाट प्रसन्न वाटत होती. मृण्मयी खिडकीपाशी गेली आणि जरावेळ ह्या मैफिलीत रमली. खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याबरोबर मृण्मयीला फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध जाणवला. तेवढ्यात आंब्यावरच्या कोकिळेने "कु ऊS उ" अशी साद दिली. मृण्मयीने गंमत म्हणून तिला प्रतिसाद दिला. थोडावेळ हा खेळ चालला. मृण्मयी स्वतःशीच हसली...


आकाशशी लग्न ठरल्यापासून मृण्मयी आनंदात होती. कसं एका क्षणात सगळं चित्र बदललं होतं. तिच्या विश्वाची व्याप्ती वाढली होती आणि इथून पुढे वाढणारच होती. लग्नाला तसा बराच अवकाश होता. लग्नानंतर मात्र ती तिच्या मातीपासून-माणसांपासून दूर-दूर जाणार होती. आता इथला प्रत्येक क्षण अनमोल होता आणि येणारी प्रत्येक अनुभुति मनाच्या खजिन्यात जपून ठेवावी अशी...


मृण्मयीने मनातल्या मनात यादीच केली...

  • बागेतल्या झाडांशी गप्पा मारणे...
  • पहाटे उठून पक्षी संमेलनाला हजेरी लावणे...
  • आजोबांबरोबर फिरायला जाणे...
  • आजीच्या कुशीत विसावणे...
  • भावंडांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर दंगा करणे...
  • आंब्याच्या मोहराचा, जाई-जुई-चाफा-मोगरा-रातराणीच्या गंधाचा भरभरून आस्वाद घेणे...
  • आई-बाबा नको नको म्हणाले तरीही रात्री त्यांचे पाय चेपून देणे...
  • उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत, गप्पा मारत झोपेच्या आधीन होणे...
  • संध्याकाळीच्या वारं अंगावर घेत तळ्याकाठी सुर्यास्त बघायला जाणे...
  • मनसोक्त खादडणे...
  • पावसात भिजणे...
  • गौरी-गणापतीच्या आरतीत रमणे...
  • हिवाळ्यात शेकोटीभोवती कोंडाळे करून गप्पा झोडणे...
  • घासाघीस करत खरेद्या करणे...


"हे काय मीनू, आज इतक्या लवकर उठून बसलीयेस", आईच्या आवाजाने मृण्मयी भानावर आली.


"काही नाही गं, असंच" मृण्मयी म्हणाली खरी, पण तिचे पाणावलेले टपोरे डोळे आईच्या सुक्ष्म नजरेतून सुटले नाहीत...