Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Saturday, July 01, 2006

पावसाच्या गोष्टी - ॥३॥

'कॉफी हाऊस' च्या वरच्या मजल्यावरच्या नेहेमीच्या जागेवर ते दोघे बसले. हे त्या दोघांच आवडीचं ठिकाण होतं. इथे निवांत गप्पा मारत-कॉफी पित बसायला त्यांना आवडायचं. अशी निवांत ठिकाणच हळूहळू नाहिशी होत होती. अर्थात, दोघं नोकरीला लागल्यापासून, त्यांच्या आयुष्यातला निवांतपणाही जवळपास लुप्तच झाला होता. तरीही ८-१५ दिवसांत एकदातरी वेळ काढून भेटायचेच असा त्यांनी नेम केला होता.

३ वर्षांपूर्वी इथेच त्यांची प्रथम ओळख झाली होती. University मध्ल्या वार्षिक 'India Night'च्या नियोजनाविषयी चर्चा करायला, committeeने येथे भेटायचे ठरवले होते. दोघेही त्याच वर्षी PhD करायला म्हणून तिथे दाखल झाले होते. अभ्यासाचे विषय वेगवेगळे असले तरी - नवीन देश, कला-संगीत-भटकंती-माणसं अशा समान आवडी, मोकळे, गप्पिष्ट स्वभाव ह्यामुळे त्यांची लगेच गट्टी जमली.

पण आज गप्पा मारायला फुरसत नव्ह्ती. त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी दोघांकडे सोपविण्यात आली होती. कार्यक्रम १५ दिवसांवर आला होता तरी त्यांची काहीच तयारी झाली नव्हती. आज किमान कच्चा मसुदा लिहून काढायचा असा दोघांनी निश्चय केला होता.

कॉफीचे घुटके घेत, चर्चा करत, मनातले विचार कागदावर उतरविण्यात ते मग्न होते. त्याचे अक्षर चांगले म्हणून लिखाणाचे काम तिने नेहेमीप्रमाणे त्याच्यावर ढकलले होते. ३-४ कॉफीच्या फेऱ्यांनंतर, तब्बल २-२.५ तासांनी ते विसावले. काम मनासारखे झाले म्हणून दोघेही खुश होते.

थोडावेळ गप्पा मारून घरी जावे असे त्यांनी ठरवले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पावसाळ्याचे दिवस असूनही बाहेर सुर्य तळपत होता. हळूहळू गप्पा रंगात आल्या - कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, गमती-जमती, सध्याची धकाधकीची दिनचर्या...

लख्ख ऊन होतं आणि पावसाला सुरूवात झाली होती. ऊन्हामुळे पाण्याचे थेंब चकाकत होते. मोठे मनोरम दृश्य होते. तिने त्याचे लक्ष बाहेरच्या पावसाकडे वेधले. दोघेही गप्पा विसरून पावसात हरवले. काही क्षण असेच गेले. अचानक त्याचे लक्ष काचेवर पडलेल्या तिच्या हसऱ्या प्रतिबिंबाकडे गेले. त्याला प्रथमच तिचे सौंदर्य जाणवले. तो स्वतःशीच हसला. दोघांनी एकमेकाकडे पाहिले - डोळे मनातलं सर्व काही बोलून गेले. पाऊस जितका अचानक आला तितकाच अचानक थांबला....दोघांच्याही नकळत, अनाहूतपणे, त्यांच्या आयुष्याच्या एका नवीन सोनेरी पर्वाची सुरूवात झाली होती.

पावसाच्या गोष्टी - ॥२॥

काळे ढग दाटू लागले आणि आभाळ गडगडू लागलं. उष्म्याने आसुसलेले जीव आपापल्या फ्लॅटच्या बाल्कनीत जमू लागले. एखादीतरी जोरदार सर यावी आणि वातावरण थोडे थंड व्हावे असे प्रत्येकालाच मनोमन वाटत होते. काळ्या ढगांची गर्दी वाढली, तशी, लहान-मोठ्यांच्या मनातली ही इच्छा पूर्ण होणार अशी खात्री वाटू लागली.

रविवार असल्यामुळे बरीचशी लोकं घरीच होती. काही मंडळी आकाशाकडे आशाळभूत नजरेने बघत होती, तर काही गप्पांमधे रमली होती. एरवी आपापल्या फ्लॅटच्या बंदिस्त विश्वात मग्न असलेली माणसं, येणाऱ्या पावसाच्या निमित्ताने का होईना, एकमेकांशी संवाद साधत होती. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.

एखाद्या स्वागत समारंभात गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा तसे काही थेंब पडले. हळूच ह्या थेंबांचा जोर वाढला, मधेच थोडावेळ थांबला आणि अचानक परत सुरू झाला; जणू ढगाआड लपलेला एखादा खट्याळ मुलगा पाण्याच्या पिचकारीने जमिनीवरच्या मंडळींना चिडवत होता. मनातला उल्हास शब्दावाटे बाहेर पडू लागला.

हे असे तुरळक थेंब येताच, खालच्या आवारात पोरांची गर्दी जमली. मुलं त्यांच्या-त्यांच्या दंगा-मस्तीत रममाण झाली. बाललीला बघण्यात मोठेही दंग झाले. अचानक पाऊस यायला लागला - रप-रप-रप-रप. मुलांचा किलबिलाट आणखीनच वाढला.

"अरे, पावसात भिजू नकोस. चल ये वरती...."
"सर्दी-खोकला झाला की मग बघ हं..."
"भिजलीस-तब्येत बिघडली आणि शाळेचा पहिला दिवस बुडाला की बघ तूच काय ते सांग तुझ्या बाईंना...."


साधारण असे काहीसे संवाद प्रत्येक बाल्कनीतून ऐकू येत होते. पण पोरच ती, ती कसली जुमानताहेत!

"मम्मा, प्लीज प्लीज, प्लीSज," रिया सोनालीभोवती नाचत होती. "मला पन पावशात खेलायचय!".....फक्त १० minutes प्लीSज". अखेर सोनाली विरघळली. "Thaaankss!" सोलालीला पटकन मिठी मारून रियाने खालती धूम ठोकली. "लवकर ये हं," सोनालीचे शब्द रियापर्यंत पोचलेच नाहीत. तब्बल पाऊण तासानंतर पाऊस थांबला. स्वच्छ कोरडे कपडे घालून रिया पुन्हा खाली आली. तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा, पाण्यात होड्या सोडायचा नवीन खेळ सुरू झाला होता. सोनाली बाल्कनीतून लेकीला कौतुकाने न्याहाळत होती.

"मSम्माS, हे बघ, माझी बोSट," रिया हात उंचावून, सोनालीला, तिने बनवलेली होडी दाखवत होती. आईची शाबासकी मिळताच, रियाने होडी पाण्यात सोडली; उतार असल्यामुळे होडी पुढे जाऊ लागली. "मम्माS बोट जाते का गं, बाबांकडे? अमेरिकेला..."

प्रश्नाच्या उत्तराकडे रियाचे लक्षच नव्हते. पुढे जाणाऱ्या बोटीकडे बघण्यात, बाबांच्या भेटीच्या स्वप्नरंजनात रिया केव्हाच हरवली होती. दूरदेशी असलेल्या साहिलच्या, रियाच्या बाबांच्या आठवणीने मात्र सोनालीचे डोळे नकळत भरून आले.

Sunday, June 18, 2006

पावसाच्या गोष्टी - ॥१॥

फेटा सारखा करून, खांद्यावर उपरणं टाकत नाम्या खाटेवरून उठला. "जनेS, येतो गं," असं म्हणत बाहेर जायला निघाला. नाम्याची हाक ऐकताच जनी दारी आली. "आवं," डोक्यावरचा पदर सावरत तिने नाम्याला हाक मारली. नाम्याने नुसतीच मान वळवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजर रोखली. "लवकर येताय न्हवं....बस्ता बांधाया तालुक्याला जायचयं......लक्षात हाय न्हवं...," जमिनीकडे बघत, हलक्या आवाजात तिने नाम्याला लवकर परतायची आठवण करून दिली. "व्हय व्हय, हाय लक्षात," नाम्या जरा गुरकतच म्हणाला आणि चालू लागला. जनी घरात गेली आणि कामाला लागली, पण त्यात तिचे लक्ष लागेना. नाम्याच्या काळजीने तिचा चेहेरा उतरला...

नाम्याचं डोकं आजकाल ठिकाणावरच नसायचं. तीन वर्ष सतत दुष्काळ आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतात पीक असं काही झालच नव्हतं. शेतीकरता घेतलेलं कर्ज वाढतच चाललं होतं. पावसाच्या-पीकाच्या-कर्जाच्या काळजीने नाम्याला पार पोखरून काढले होते. त्यात यंदा चंपीचं लगीन करायचं होतं. ह्या वर्षीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे नाम्या अधिकच हताश झाला होता.

"ए बाय....बाहेर अंधारून आलय....ये बघ." चंपीच्या आवाजाने जनीची तंद्री भंग पावली. भानावर येत ती "आले, आलेS," म्हणत उठली. परसदारी चंपी हसत काळ्या ढगांकडे बघत होती. जनी बाहेर येऊन आकाशाकडे बघत, हात जोडून काहीतरी पुटपुटली....मग एक सुस्कारा सोडत स्वतःशीच हसली. "बाय, चल बा कडं शेतावर जाऊ," चंपी उत्साहाने म्हणाली. "चल काहीतरीच," असं म्हणत जनीनं तिला उडवून लावलं. पण चंपीनं लकडाच लावला तेव्हा जनी तयार झाली.

पावसाच्या आत शेतावर पोचता यावं म्हणून दोघी लगबगीनं निघाल्या. सुसाट्याचा वारा सुटला होता; छोटी धुळीची वादळं उठवत होता. आकाशात मोठ्ठाल्ले काळे ढग दाटले होते आणि मधूनच गडगडण्याचा आवाज येत होता. जनी-चंपी शेतात पोचल्यातोच टप्पोरे थेंब पडू लागले. बघता-बघता पावसाचा जोर वाढला. जनी-चंपी खिदळत पळायला लागल्या. पावसाचा जोर आणखी वाढला. मुसंडी मारून पळत त्या जवळच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला पोचल्या. चंपीने चेहेरा पुसायला तोंड वर केले, पण समोरचे दृश्य पाहून ती हबकली. "बाSय" एवढेच ती कशीबशी किंचाळली.

फासावर लोंबकळणाऱ्या नाम्याचा निर्जीव देह पाहून जनी तिथल्या-तिथेच थिजली. तिच्या थिजलेल्या नजरेतून एक नवीन पाऊस सुरु झाला होता आणि तुटलेल्या काळजात एक नवीन वादळ...

Saturday, November 19, 2005

भाकर

रेल्वेस्टेशन मुळी कधी झोपतच नसे; सतत येणाऱ्या गाडया, त्यात चढणारे-उतरणारे प्रवासी, त्यांना पोचवायला-घ्यायला आलेली मंडळी, रेल्वे कर्मचारी, स्टॉलवाले आणि रिकामटेकडया लोकांची तिथे सतत वर्दळ असे. त्यातच गेल्या १-२ महिन्यात स्टेशनालगतच्या झोपडपट्टया पुन्हा फोफावल्या होत्या. ह्यामुळे माणसांच्या रहदारीत आणखी भर पडली होती.

रात्रीच्या वेळी, ह्या झोपडपट्टयातील पुरुष मंडळी, स्टेशनवरच्या waiting roomमध्ये किंवा फलाटावरच्या बाकडयांवर झोपायला येत. सकाळी गर्दी वाढायच्या आत ही मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरजण स्टेशनवरच्या स्नानगृहांमध्ये न्हाणी-धुणी उरकत. मग मोठयांना काम असल्यास ते कामावर जात आणि त्यांची पोरं दिवसभर इथे-तिथे उंडारत. महिना-दोन महिन्यातून रेल्वे पोलिस स्टेशनावर गस्त घालत आणि दमदाटी करून ह्या लोकांना हाकलून लावीत. असं झालं की मग ही मंडळी थोडे दिवस स्टेशनापासून लांब राहात, पुन्हा ४-१ दिवस झाले की 'जैसे थे'.

ह्याच झोपडपट्टीत एक कुटुंब होतं परश्याचं. गेली ३ वर्ष गावी दुष्काळ म्हणून शेतावर कामं मिळेनाशी झाली. मग गावातल्या इतरजणांप्रमाणे परश्यानंही शहराकडे धाव घेतली. गावाकडचं किडूक-मिडूक विकून परश्या, त्याची बायको गंगी आणि २ पोरांना घेऊन शहरात आला. त्याच्या गावचा नाम्या ह्याच झोपडपट्टीत रहायचा. नाम्याच्या मदतीने परशा-गंगीने ह्याच झोपडपट्टीत आपला संसार थाटला. परशा-गंगीला २ पोरं; मोठा योग्या आणि त्याच्या नंतर वर्षानेच झालेली सुमा. परशा-गंगीला रोज गावची आठवण येई, पोरं मात्र शहरावर बेहद खुश होते. रस्त्यावरून भरगाव धावणाऱ्या वेगवेगळ्या गाडया आणि घराजवळून जाणाऱ्या लांबचलांब आगगाडया ह्याची त्यांना सर्वात जास्त गंमत वाटत असे. अशी मज्जा नव्ह्तीच मुळी गावाकडे!

परशा-गंगी स्टेशनजवळ्च्या बांधकाम साईटवर मजुरी करत. पुढच्या वर्षीपर्यंत पैसे साठवून पोरांना शाळेत घालयचा निश्चय, परशाने केला होता. परशा-गंगी कामावर गेले, की योग्या आणि सुमा स्टेशनाकडे धाव घेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांकडे बघत, कधी एखाद्या गाडीशी शर्यत लावण्यात त्यांचा वेळ छान जाई. इतर बहिण-भावाप्रमाणे, योग्या सुमाचीही भांडणं होत पण, अगदी क्वचित. तसा योग्या खूपच समजुतदार होता आणि आपल्या धाकटया बहिणीची व्यवस्थित काळ्जी घ्यायचा. सुमाला रंगीबेरंगी चित्रं फार आवडत. कधी-कधी फलाटावर पडलेल्या कागदांच्या कचऱ्यातून, योग्या सुमाकरता चित्र आणत असे. नवीन चित्र पाहून, सुमाची कळी हमखास खुलत असे. मग त्या दिवशी रात्री जेवताना, आपल्या पानातली अर्धी भाकर, सुमा, गंगीची नजर चुकवून योग्याच्या पानात घालत असे.

दिवाळी संपून आता चांगलीच थंडी पडायला लागली होती. शहरात, निवडणूक प्रचारला जोर आला होता. प्रचारच्या घोषणा करत जाणाऱ्या गाडयांची, योग्या सुमाला मोठी गंमत वाटे. नगरसेवक गणपत ढमढेऱ्यांना पुन्हा खुर्ची मिळेल की नाही ही काळजी सतावत होती. मागच्या निवडणूक प्रचारात केलेल्या घोषणा/आश्वासनं आता त्यांना भेडसावत होती. पुन्हा खुर्ची मिळवायची, तर दिलेली काही आश्वासनं पूर्ण करायला हवीत किंवा त्या द्रुष्टीने किमान हात-पाय तरी हालवायला हवेत असा सल्ला, ढमढेऱ्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दिला. विचार विनिमयानंतर, 'अतिक्रमण हटवू' हे आश्वासन पूर्ण करणे हे वेळेच्या आणि इतर सर्वच द्रुष्टीने सोयीस्कर आहे असे ठरले.

आज गंगीला जरा लवकरच जाग आली. रात्री का कोण जाणे तिला नीट झोप आली नाही. उठल्यावरही तिला उगाच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आळस झटकून ती उठली. पोरं, परश्या उठायच्या आत आवरून घ्यावं, म्हणून लगालगा कामाला लागली. सैपाक करायला काहीच नव्हतं, पण आज पगार झाल्यावर सामान आणू असा विचार तिने केला. पोरं दिवसभर उपाशी रहातील ह्या विचाराने ती कळवळली.

"योग्या सुमे, उठा रं पोरांनो" अशा हाका मारत गंगी पोरांना उठवू लागली, कामावर जायची वेळ झाली होती. डोळे चोळत बिचारी पोरं उठून बसली. थंडीमुळे सकाळी उठावसंच वाटायचं नाही त्यांना! "ये पोरांनो, आज काय बी सैपाक केला न्हाई रे ल्येकरांनो! सांच्याला सामान आणून तुमच्या आवडीचं दान्याचं कालवन करीन" एवढं म्हणून गंगी परश्या बरोबर बाहेर पडली.

दिवसभर इकडे-तिकडे भटकल्यामुळे योग्या सुमा पार थकली होती. सकाळपासून अन्नचा एक कणही पोटात गेला नव्हता. संध्याकाळ झाली तशी योग्या सुमाला म्हणाला, "सुमे, बा-आय यायची येळ झाली. चल घरला जाऊ." दोघांच्या मनात, गरम-गरम भाकरी आणि दाण्याच्या कालवणाचेच विचार चालले होते. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि एकमेकाच्या मनातले विचार ओळखले. तसे होताच दोघंही खळाळून हसले आणि हातात हात घालून घराकडे चालू लागले.

गर्दी योग्याला लांबूनच दिसली, बावरून तो इकडे तिकडे बघू लागला. सगळ्या झोपडया जमीनदोस्त झाल्या होत्या. त्याने सुमाचा हात घट्ट पकडला आणि त्यांच्या झोपडीच्या दिशेनी झपाझपा चालायला लागला. तेवढयात त्याला रडण्याचा आवाज आला. त्याने गंगीचा आवाज ओळखला. गर्दी लोटत, सुमाला ओढत, तो पुढे पळत सुटला आणि पुढे जाताच अचानक थबकला. समोर त्याची आय मोठयाने रडत होती, जमीनीवर डोकं आपटीत होती. तिच्यासमोर त्याचा बा निपचीत पडला होता. बाच्या अंगावर जखमा होत्या. योग्या-सुमाला बघून, गंगीने हंबरडा फोडला, "बा गेला रं!!" एवढं म्हणून तिने दोघांन कवटाळले. गंगीला रडताना बघून योग्या-सुमाही रडू लागले.

थोडयावेळाने काही जण 'बा'ला कुठेतरी घेऊन गेले. गंगी रडतच होती. योग्या-सुमा रडतच झोपी गेले. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा गंगी कुठेच दिसेना. आय कामाला गेली असेल असा विचार योग्याने केला. रात्रभर रडल्याने दोघांचे डोळे सुजून लाल झाले होते आणि डोके बधीर. उठताच पोटात भुकेचा राक्षस खवळायला लागला होता. दोघांनीही स्टेशनकडे धाव घेतली - कालच्यासारखं पाणी पिऊन भूक शांत करावी ह्या हेतुने.

फलाटावर चालता चालता सुमाला भाकरीचा एक चतकोर दिसला. तिने योग्याचा सदरा ओढून त्याला बोटानेच तो दाखवला आणि धावत जाऊन उचलला. एवढयात तिला योग्याची चेष्टा करायची हुक्की आली. हातातला भाकरीचा तुकडा त्याला दाखवत, ती पळू लागली. योग्याला हे अनपेक्षित होते, पण लगेच सावरून, तो "सुमे, सुमे!!" करत तिच्या पाठीमागे धावू लागला.

अचानक फलाटावर गर्दी झाली; कुठल्यातरी गाडीचा horn जोरात वाजला. योग्या-सुमाला मात्र गर्दीचे भानच नव्ह्ते. तेवढयात गर्दीमधल्या कुणाचातरी धक्का लागून सुमाच्या हातातला भाकरीचा तुकडा खाली पडला. उचलायला ती खाली वाकली, पण गर्दीचा लोट आला. वाळलेल्या भाकरीच्या चतकोराचे लोकांच्या पायाखाली तुकडे-तुकडे झाले. गर्दी सरली, योग्या सुमाच्या जवळ आला, भरलेल्या डोळ्यांनी आणि खिन्न चेहेऱ्यांनी दोघेही त्या तुकडयांकडे बघत स्तब्ध उभे राहिले.