Saturday, January 13, 2007

जुनं ते...


"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं"

रेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....

आता आमच्याच घरात बघा ना, प्रत्येक गोष्टीला आपला असा इतिहास आहे. अगदी वाटी-चमच्यापासून ते fridge, dining table पर्यंत. Dining table आई-बाबांच्या लग्नानंतरचं, तर fridge माझ्या पहिल्या वाढदिवसाचा. पलंग-कपाटं २० वर्षांपूर्वी नवीत घरात घेतलेली. प्रत्येक वस्तूने आपआपले काम चोख बजावले आहे, इतके, की घरातील प्रत्येक व्यक्तीचे ह्या वस्तूंवर आपआपल्या परीने भावबंध जुळले आहेत.

नाविन्याचा आणि सौंदर्याचा (थोड्याफार प्रमाणात का होईना) ध्यास असलेल्या आम्हाला, कधी-कधी, 'पूरे घर के बदल डालूँगा' अशी हुक्की येते. बदलाचे वारे घरात वाहू लागते.

"कशाला, सध्या काम भागतय ना? शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल??" - इति मातोश्री"
सध्या आहे ते इतकंही वाईट नाहीये, नाही का? उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं!" - आमच्या मनातला बारिक आवाज.

असं झालं की आमचं बदलाचं आवसान गळून पडतं आणि नेहेमीच्या सरावलेल्या वातावरणात आम्ही पुन्हा स्थिरस्थावर होतो.

'जुनं ते सोनं' किंवा 'झिजेपर्यंत वापरा'चे नकळत आमच्यावरही संस्कार झाले आहेत. तरीही चेष्टा-मस्करी करताना आम्ही मातोश्रींना ह्यावरून भरपूर हसतो. पण ह्याबद्दल खोलवर विचार केला की जाणवतं की दोष व्यक्तीचा नाहीये. तो काळच तसा होता, अभावाचा - पैशाच्या अभावाचा, बाजाराच्या अभावाचा, ई. त्यामुळे आहे त्यात निभावण्याची मनाला आपोआपच सवय लागली असावी. अभिरूची, सौंदर्यदृष्टी असल्या संकल्पना ही तेव्हा अस्तित्वात नव्हत्या.

पण आता जमाना बदलला आहे. आजचा काळ आहे सुबत्तेचा, सहज मिळणाऱ्या पैशाचा, सुखसोयींचा. 'पैशाचं काय करायचं' हा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे आणि 'खरेदी', हे बहुतांश लोकांना सापडलेलं सहज, सोप्पं उत्तर आहे. अनेक (नको असलेल्या?) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच?) महत्त्व प्राप्त झाले आहे.

असो. काय योग्य, काय अयोग्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे....तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? अवश्य कळवा...

Thursday, January 04, 2007

फिदा

यंदाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा चारही दिवस पूर्णपणे आनंद लुटता आला. महोत्सवात गायन-वादन सादर करणारे सर्व कलाकार उत्कृष्टच असतात; तरीही काहींच्या महफिली इतरांपेक्षा अधिक रंगतात आणि आठवणींच्या सुवर्णकुपीत कायमचं घर करतात. ह्या वर्षीचा महोत्सव कुणामुळे लक्षात राहील, असा प्रश्न मला कोणी विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं - 'कौशिकी चक्रवर्ती'.

कार्यालयातून थेट कार्यक्रमाला जायचं, मध्यरात्रीनंतर कधीतरी घरी पोचायचं की परत सकाळी लवकर कामावर हजर; असा काहीसा कार्यक्रमाच्या दिवसात माझा परिपाठ होता. महोत्सवाचा दुसरा दिवस होता. शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनानंतर, पोट, बाहेरच्या खाण्या-पिण्याच्या stallsकडे खुणावू लागलं. पटकन पोटोबा उरकावा आणि हात-पायही मोकळे करावेत ह्या हेतूने मी बाहेर पडले. नंतरचे गाणे कौशिकी चक्रवर्तींचे होते. कौशिकी, ह्या पं अजय चक्रवर्तींच्या कन्या व शिष्या, ह्या पलिकडे, मला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नव्हती......

सवाई गंधर्वला येणारे बहुतांश रसिकगण खवैयेही असावेत असे मला वाटते - जितकी गाण्याला तितकीच खाण्यालाही गर्दी असते! गर्दीतून वाट काढत कशी-बशी stallsपाशी पोचले. हवा तो पदार्थ मागवून मिळेपर्यंत आणि खाण्याकरता त्यातल्यात्यात निवांत कोपरा शोधण्यात थोडासा वेळ गेलाच. गर्दी असूनही ओळखीचे कोणीनाकोणीतरी भेटत गेले आणि नाही म्हटलं तरी च्याऊ-म्याऊचा आमचा फेरफटका लांबला. तेवढ्यात स्वरमंडपातून बहारदार ताना ऐकू येऊ लागल्या आणि त्याला मिळणारी रसिकांची मनमोकळी दादही. आता मात्र मला बाहेर थांबल्याचे थोडेसे अपराधीच वाटू लागले.

लगबगीने स्वरमंडपात पोचले तेव्हा राग रागेश्रीमधील 'मेरो मन हरवा...' ही बंदिश रंगात आली होती. गोल-गुबगुबीत चेहेरा, बंगप्रांतीय मुलींप्रमाणे नितळ-उजळ कांती, काजळ घातलेले विलक्षण बोलके डोळे आणि अतिशय लोभसवाणे स्मितहास्य - कौशिकींनी माझ्या ह्रदयात तत्काळ जागा मिळवली.

राग रागेश्रीनंतर कौशिकींनी एक सुरेख ठुमरी सादर केली - 'रंगी सारी गुलाबी चुनरिया रे.." कुठलीही कला सादर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराची तयारी. परंतू जोपर्यंत त्या सादरीकरणात भाव उतरत नाही तोपर्यंत, ते सादरीकरण अपूर्णच, असे मला वाटते. शास्त्रीय संगीत, सामान्य माणसाला रुचेल अशा पद्ध्तीने सादर केले जात नाही असा बऱ्याच जणांचा आरोप असतो आणि तो मला काही अंशी पटतो देखील. कौशिकींचे गाणे मात्र थेट रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचत होते एवढे नक्की! त्यांचा आवाज, गाण्यात उतरणारा भाव आणि नजाकत, रसिकांवर अशी मोहिनी घालत होती की नकळत प्रेक्षकातील प्रत्येकाच्या मुखातून 'वाSSहSवा'ची बरसात होत होती.

कौशिकी जेव्हा गाणं संपवून उठल्या तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून, टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.

आज पुन्हा कौशिकींच्या स्वरगंगेत न्हायचा योग आला. बिहाग, मालकंस आणि त्यांनी पेश केलेल्या इतर नजराण्यांच्या धुंदीतच वावरत्ये मी!