Tuesday, August 15, 2006

कलियुग


काही महिन्यांपूर्वी घालवलेल्या एका दिवसावरून पहिल्या काही ओळी सुचल्या. आज डायरीची पानं उलगडताना ते शब्द पुन्हा नजरेस पडले आणि नवीन शब्द सुचू लागले. ह्यात मांडलेले विचार काही नवीन नाहीत...असो. नमनाला एवढे तेल पुरे...

औपचारिक गप्पा,
कोरडे संभाषण,
खोटे हास्य..

बोथट संवेदना,
बंद दरवाजे,
संकुचित मनं...

नात्यांचा गुंता,
वेळेचा अभाव,
वेगवान जीवन...

खळखळणारा पैसा,
बिघडलेलं स्वास्थ्य,
बेचैन मनं...

संपर्क माध्यमांचा सुकाळ पण माणसांची एककल्ली बेटं...

Thursday, August 10, 2006

नेमेचि येतो पावसाळा


सध्या कार्यालय-घर हा प्रवास फारच वेळ घेऊ लागला आहे. कारण सांगायलाच नको - पाऊस, रस्त्यांवरील खड्डे (नव्हे खड्डयामधील रस्ते..) आणि शिस्तप्रिय पुणेकर! काल गाडी इंच-इंच पुढे दामटत असताना "नेमेचि येतो पावसाळा" ह्या काव्यपंक्ती आठवल्या. मनातली चडफड hornद्वारे व्यक्त करण्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते. रस्ता मोकळा होण्याची वाट बघता बघता, मनात शब्दखेळ सुरू झाला. त्या खेळाला अर्थपूर्ण बनविण्याचा हा एक सूक्ष्म प्रयत्न.

नेमेचि येतो पावसाळा...
नभ वसुधेचा मिटतो अबोला,
रंगतो भूमंडळी मिलन सोहळा,
मृद्गंधाची धुंदी नाही असा विरळा...

नेमेचि येतो पावसाळा...
मंडूक गायनाला येतो उमाळा,
बालपणीच्या आठवणींना मिळतो उजाळा,
झुलते मन हर्षोल्लासाचा हिंदोळा...

नेमेचि येतो पावसाळा...
सोडून जातो खड्डयांचा गोतावळा,
कुंद वासाचा येतो उबाळा,
सूर्यकरांची ओढ लावी जिवाला...

तरी मज वाटे त्याचा जिव्हाळा,
सर्जनशीलतेचा फुलवी पिसारा...
नेमेचि यावा पावसाळा...
नेमेचि यावा पावसाळा...

Friday, August 04, 2006

मराठी पुस्तकांविषयी थोडेसे..


नंदनने मला ह्या खेळात सामील करून घेतले. खेळाविषयी अधिक माहिती करता - http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक.
~ 'रारंग ढांग' - प्रभाकर पेंढारकर

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती.

~ नुकतीच सुरूवात केली आहे, त्यामुळे लेखकाच्या शब्दात सांगायचे तर - "एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे! निसर्गात आणि माणसांत जशी येथे रस्सीखेच व संघर्ष, तसाच प्रसंगी माणसामाणसातही! त्याची ही कथा."

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) ५ पुस्तके.
~ 'बदलता भारत' - भानू काळे
~ 'स्मृति-चित्रे' - लक्ष्मीबाई टिळक
~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर, कै. विष्णूशास्त्री चिपळूणकर, कै. हरि कृष्ण दामले
~ 'वाइज ऍन्ड अदरवाइज' - सुधा मूर्ती (मराठी अनुवाद)
~ 'मी कसा झालो' - आचार्य अत्रे

४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके.
~ 'आमच बाप अन आम्ही' - नरेंद्र जाधव
~ 'ययाति' - वि.स. खांडेकर
~ 'दासबोध' - समर्थ रामदासस्वामी
~ Sorry can't think of more right away.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.

~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - शाळेत शिकत असताना, एका सुट्टीत गावी गेले होते. त्यावेळी तिथल्या घरी मला ह्या ५ पुस्तकांचा संच सापडला. पुस्तकांची पानं जीर्ण झाली होती; अगदी जपून पुस्तकं हाताळायला लागत होती. ह्यातल्या गोष्टी, वाचणाऱ्याला, एका वेगळ्याच अद्भुत विश्वाची (राजकुमार-राजकन्या, त्यांच्या चमात्कारिक शक्ती, गोष्टी..) सफर घडवून आणतात. ह्यामुळेच माझ्या बालमनाला ती पुस्तके भावली असतील असे वाटते. त्यावेळी मला खजिना गवसल्यासारखे वाटले होते; अजूनही मी ती पुस्तक जपून ठेवली आहेत.

~ इतक्यात वाचनात आलेल्या 'बदलता भारत' हे पुस्तक मला फार आवडले. त्या बद्दल थोडेसे इथे - http://dhyaas.blogspot.com/2005/12/blog-post.html

ह्य खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करते -

Saturday, July 01, 2006

रंगरंगोटी


गेला महिनाभर घरात रंगाचे काम सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून ह्या कामाला मुहुर्तच लागत नव्ह्ता. तसं रंगकाम बरेच जिकीरीचे काम - रंगाचा वास, घरभर धूळ-पसारा, सामानाची बांधाबांध, हालवा-हालव आणि नंतर आवराआवर; नुसत्या विचारानेच नकोसे वाटते. अखेर काम करायचे निश्चित झाले. मग सतराशे-साठ catalogues बघून रंग संगती, रंगाचे प्रकार वगैरे ठरविण्यात आले.

सर्व रंगाऱ्यांनी मन लावून काम केले. नवीन रंगाचा लेप लावण्यापूर्वी प्रत्येक भिंत घासून काढण्यात आली. आवश्यक असल्यास लांबी लावून ती एकसारखी करण्यात आली आणि मगच त्यावर नवीन रंग चढविण्यात आला. रंगकामानंतर जणू आमच्या घराचा कायापालटच झाला!...सर्व काही चकाचक, नवीन भासू लागले. घरात प्रवेश करताच उत्साही वाटते.

असो, ह्या लेखाचा उद्देश रंगपुराण कथन करणे हा नाही. परवा मनात सहज विचार तरळून गेला - आपलं मनही एखाद्या घरासारखेच आहे. घरात माणसं रहातात, तर मनात विचार वास करतात. घर सुबक, नीट-नेटकं दिसावं ह्याकरता आपण सतत झटत असतो. नव-नवीन सामान आणून त्याची सुबक रचना कर, घराला रंगरंगोटी कर......पण मनाचं काय? आपलं मन कसं आहे ह्याचातरी आपण वेळोवेळी ठाव घेतो का? आपल्या मनातील विचारच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. मग ह्या विचारमंदिराच्या भिंतीही वेळोवेळी नवीन विचारांनी रंगवायला नकोत का? जुन्या, कालबाह्य विचारांना घासून काढून, त्यावर नवीन विचारांचा रंग चढवायलाच हवा.

आजच्या दहिवरासम जगात तग लागण्याकरता आणि आयुष्य समरसून जगण्याकरता, मनावर नवविचारांची रंगरंगोटी, कितीही नकोशी, अवघड वाटली तरीही, आवश्यकच नाही का?

पावसाच्या गोष्टी - ॥३॥

'कॉफी हाऊस' च्या वरच्या मजल्यावरच्या नेहेमीच्या जागेवर ते दोघे बसले. हे त्या दोघांच आवडीचं ठिकाण होतं. इथे निवांत गप्पा मारत-कॉफी पित बसायला त्यांना आवडायचं. अशी निवांत ठिकाणच हळूहळू नाहिशी होत होती. अर्थात, दोघं नोकरीला लागल्यापासून, त्यांच्या आयुष्यातला निवांतपणाही जवळपास लुप्तच झाला होता. तरीही ८-१५ दिवसांत एकदातरी वेळ काढून भेटायचेच असा त्यांनी नेम केला होता.

३ वर्षांपूर्वी इथेच त्यांची प्रथम ओळख झाली होती. University मध्ल्या वार्षिक 'India Night'च्या नियोजनाविषयी चर्चा करायला, committeeने येथे भेटायचे ठरवले होते. दोघेही त्याच वर्षी PhD करायला म्हणून तिथे दाखल झाले होते. अभ्यासाचे विषय वेगवेगळे असले तरी - नवीन देश, कला-संगीत-भटकंती-माणसं अशा समान आवडी, मोकळे, गप्पिष्ट स्वभाव ह्यामुळे त्यांची लगेच गट्टी जमली.

पण आज गप्पा मारायला फुरसत नव्ह्ती. त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी दोघांकडे सोपविण्यात आली होती. कार्यक्रम १५ दिवसांवर आला होता तरी त्यांची काहीच तयारी झाली नव्हती. आज किमान कच्चा मसुदा लिहून काढायचा असा दोघांनी निश्चय केला होता.

कॉफीचे घुटके घेत, चर्चा करत, मनातले विचार कागदावर उतरविण्यात ते मग्न होते. त्याचे अक्षर चांगले म्हणून लिखाणाचे काम तिने नेहेमीप्रमाणे त्याच्यावर ढकलले होते. ३-४ कॉफीच्या फेऱ्यांनंतर, तब्बल २-२.५ तासांनी ते विसावले. काम मनासारखे झाले म्हणून दोघेही खुश होते.

थोडावेळ गप्पा मारून घरी जावे असे त्यांनी ठरवले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पावसाळ्याचे दिवस असूनही बाहेर सुर्य तळपत होता. हळूहळू गप्पा रंगात आल्या - कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, गमती-जमती, सध्याची धकाधकीची दिनचर्या...

लख्ख ऊन होतं आणि पावसाला सुरूवात झाली होती. ऊन्हामुळे पाण्याचे थेंब चकाकत होते. मोठे मनोरम दृश्य होते. तिने त्याचे लक्ष बाहेरच्या पावसाकडे वेधले. दोघेही गप्पा विसरून पावसात हरवले. काही क्षण असेच गेले. अचानक त्याचे लक्ष काचेवर पडलेल्या तिच्या हसऱ्या प्रतिबिंबाकडे गेले. त्याला प्रथमच तिचे सौंदर्य जाणवले. तो स्वतःशीच हसला. दोघांनी एकमेकाकडे पाहिले - डोळे मनातलं सर्व काही बोलून गेले. पाऊस जितका अचानक आला तितकाच अचानक थांबला....दोघांच्याही नकळत, अनाहूतपणे, त्यांच्या आयुष्याच्या एका नवीन सोनेरी पर्वाची सुरूवात झाली होती.

पावसाच्या गोष्टी - ॥२॥

काळे ढग दाटू लागले आणि आभाळ गडगडू लागलं. उष्म्याने आसुसलेले जीव आपापल्या फ्लॅटच्या बाल्कनीत जमू लागले. एखादीतरी जोरदार सर यावी आणि वातावरण थोडे थंड व्हावे असे प्रत्येकालाच मनोमन वाटत होते. काळ्या ढगांची गर्दी वाढली, तशी, लहान-मोठ्यांच्या मनातली ही इच्छा पूर्ण होणार अशी खात्री वाटू लागली.

रविवार असल्यामुळे बरीचशी लोकं घरीच होती. काही मंडळी आकाशाकडे आशाळभूत नजरेने बघत होती, तर काही गप्पांमधे रमली होती. एरवी आपापल्या फ्लॅटच्या बंदिस्त विश्वात मग्न असलेली माणसं, येणाऱ्या पावसाच्या निमित्ताने का होईना, एकमेकांशी संवाद साधत होती. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.

एखाद्या स्वागत समारंभात गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा तसे काही थेंब पडले. हळूच ह्या थेंबांचा जोर वाढला, मधेच थोडावेळ थांबला आणि अचानक परत सुरू झाला; जणू ढगाआड लपलेला एखादा खट्याळ मुलगा पाण्याच्या पिचकारीने जमिनीवरच्या मंडळींना चिडवत होता. मनातला उल्हास शब्दावाटे बाहेर पडू लागला.

हे असे तुरळक थेंब येताच, खालच्या आवारात पोरांची गर्दी जमली. मुलं त्यांच्या-त्यांच्या दंगा-मस्तीत रममाण झाली. बाललीला बघण्यात मोठेही दंग झाले. अचानक पाऊस यायला लागला - रप-रप-रप-रप. मुलांचा किलबिलाट आणखीनच वाढला.

"अरे, पावसात भिजू नकोस. चल ये वरती...."
"सर्दी-खोकला झाला की मग बघ हं..."
"भिजलीस-तब्येत बिघडली आणि शाळेचा पहिला दिवस बुडाला की बघ तूच काय ते सांग तुझ्या बाईंना...."


साधारण असे काहीसे संवाद प्रत्येक बाल्कनीतून ऐकू येत होते. पण पोरच ती, ती कसली जुमानताहेत!

"मम्मा, प्लीज प्लीज, प्लीSज," रिया सोनालीभोवती नाचत होती. "मला पन पावशात खेलायचय!".....फक्त १० minutes प्लीSज". अखेर सोनाली विरघळली. "Thaaankss!" सोलालीला पटकन मिठी मारून रियाने खालती धूम ठोकली. "लवकर ये हं," सोनालीचे शब्द रियापर्यंत पोचलेच नाहीत. तब्बल पाऊण तासानंतर पाऊस थांबला. स्वच्छ कोरडे कपडे घालून रिया पुन्हा खाली आली. तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा, पाण्यात होड्या सोडायचा नवीन खेळ सुरू झाला होता. सोनाली बाल्कनीतून लेकीला कौतुकाने न्याहाळत होती.

"मSम्माS, हे बघ, माझी बोSट," रिया हात उंचावून, सोनालीला, तिने बनवलेली होडी दाखवत होती. आईची शाबासकी मिळताच, रियाने होडी पाण्यात सोडली; उतार असल्यामुळे होडी पुढे जाऊ लागली. "मम्माS बोट जाते का गं, बाबांकडे? अमेरिकेला..."

प्रश्नाच्या उत्तराकडे रियाचे लक्षच नव्हते. पुढे जाणाऱ्या बोटीकडे बघण्यात, बाबांच्या भेटीच्या स्वप्नरंजनात रिया केव्हाच हरवली होती. दूरदेशी असलेल्या साहिलच्या, रियाच्या बाबांच्या आठवणीने मात्र सोनालीचे डोळे नकळत भरून आले.

Sunday, June 18, 2006

पावसाच्या गोष्टी - ॥१॥

फेटा सारखा करून, खांद्यावर उपरणं टाकत नाम्या खाटेवरून उठला. "जनेS, येतो गं," असं म्हणत बाहेर जायला निघाला. नाम्याची हाक ऐकताच जनी दारी आली. "आवं," डोक्यावरचा पदर सावरत तिने नाम्याला हाक मारली. नाम्याने नुसतीच मान वळवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजर रोखली. "लवकर येताय न्हवं....बस्ता बांधाया तालुक्याला जायचयं......लक्षात हाय न्हवं...," जमिनीकडे बघत, हलक्या आवाजात तिने नाम्याला लवकर परतायची आठवण करून दिली. "व्हय व्हय, हाय लक्षात," नाम्या जरा गुरकतच म्हणाला आणि चालू लागला. जनी घरात गेली आणि कामाला लागली, पण त्यात तिचे लक्ष लागेना. नाम्याच्या काळजीने तिचा चेहेरा उतरला...

नाम्याचं डोकं आजकाल ठिकाणावरच नसायचं. तीन वर्ष सतत दुष्काळ आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतात पीक असं काही झालच नव्हतं. शेतीकरता घेतलेलं कर्ज वाढतच चाललं होतं. पावसाच्या-पीकाच्या-कर्जाच्या काळजीने नाम्याला पार पोखरून काढले होते. त्यात यंदा चंपीचं लगीन करायचं होतं. ह्या वर्षीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे नाम्या अधिकच हताश झाला होता.

"ए बाय....बाहेर अंधारून आलय....ये बघ." चंपीच्या आवाजाने जनीची तंद्री भंग पावली. भानावर येत ती "आले, आलेS," म्हणत उठली. परसदारी चंपी हसत काळ्या ढगांकडे बघत होती. जनी बाहेर येऊन आकाशाकडे बघत, हात जोडून काहीतरी पुटपुटली....मग एक सुस्कारा सोडत स्वतःशीच हसली. "बाय, चल बा कडं शेतावर जाऊ," चंपी उत्साहाने म्हणाली. "चल काहीतरीच," असं म्हणत जनीनं तिला उडवून लावलं. पण चंपीनं लकडाच लावला तेव्हा जनी तयार झाली.

पावसाच्या आत शेतावर पोचता यावं म्हणून दोघी लगबगीनं निघाल्या. सुसाट्याचा वारा सुटला होता; छोटी धुळीची वादळं उठवत होता. आकाशात मोठ्ठाल्ले काळे ढग दाटले होते आणि मधूनच गडगडण्याचा आवाज येत होता. जनी-चंपी शेतात पोचल्यातोच टप्पोरे थेंब पडू लागले. बघता-बघता पावसाचा जोर वाढला. जनी-चंपी खिदळत पळायला लागल्या. पावसाचा जोर आणखी वाढला. मुसंडी मारून पळत त्या जवळच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला पोचल्या. चंपीने चेहेरा पुसायला तोंड वर केले, पण समोरचे दृश्य पाहून ती हबकली. "बाSय" एवढेच ती कशीबशी किंचाळली.

फासावर लोंबकळणाऱ्या नाम्याचा निर्जीव देह पाहून जनी तिथल्या-तिथेच थिजली. तिच्या थिजलेल्या नजरेतून एक नवीन पाऊस सुरु झाला होता आणि तुटलेल्या काळजात एक नवीन वादळ...

Sunday, April 09, 2006

घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

परवा रात्री दै. लोकसत्तेची 'चतुरा' पुरवणी चाळत होते. त्यातील 'प्रतिसाद' ह्या सदराने लक्ष वेधले. एखादी (वाचकांनी पाठवलेली) ओळ देऊन, वाचकांना त्यावर आधारित कविता करायचे आवाहन करायचे, असे काहीसे त्याचे स्वरूप आहे. मेंदूला चालना म्हणून मी प्रयत्न करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असूनही एका training करता officeला जायचे होते. कवितेचा विषय तसा मनात घोळतच होता आणि चक्क दुपारी चहाच्या सुट्टीत सहजपणे कविता सुचली.

करूया एकदातरी पंढरीची वारी,
नाचूया आनंदे, म्हणत हरी-हरी.
बसूया थोडावेळ देवाचिये द्वारी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

नांदूया सौख्यभरे आपापल्या परी,
गाऊया मस्त, मारत सायकलवरून फेरी.
बागडूया स्वच्छंद घेत स्वतःभोवती घेरी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

खेळूया निवांत पिल्लांशी दारी,
हसूया मनमोकळे, स्वतःवरती तरी!
खाऊया मनसोक्त भाजी-भाकरी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

झोपूया निर्धास्त मायेचिया घरी,
जगूया बिनधास्त विसरून चाकरी.
बघूया करून स्वप्नांवरी स्वारी,
घेऊया अंगावरी पावसाच्या सरी....

Saturday, March 11, 2006

राजा - एक स्मरण

आज पावसाने अचानक हजेरी लावली. मला पाऊस नेहेमीच आवडतो. म्हणून रात्रीचं जेवण झाल्यावर, ओसरीतले दिवे मालवून, मी तिथल्या आरामखुर्चीवर विसावले. हवेत हलकासा सुखद गारवा होता, मातीचा मंद गंध आसमंतात दरवळत होता. रात्रीची नीरव शांतता अधून-मधून भंग करणारे गडगडणारे आभाळ आणि पावसाच्या थेंबांची टपटप; मन सहज भूतकाळात गेले.

मी आठवीत शिकत होते, नोव्हेंबर महिना होता. बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी, एक काका-काकू आमच्या घरी आले; माझी त्यांची ओळख नव्हती. त्यांच्याकडील nylonच्या जाळीदार पिशवीतून त्यांनी हळूच एक गोंडस Pomeranian कुत्र्याचे पिल्लू काढले. पांढऱ्याशुभ्र केसाचे ते गोंडस गुबगुबीत पिल्लू, एखाद्या कापसाच्या किंवा बर्फाच्या गोळ्यासारखेच भासले. प्राण्यांची आवड असणाऱ्या माझ्या धाकटया बहिणीला ते पिल्लू पाहून कोण आनंद झाला! कुत्र्यांची भीती वाटणारी मी मात्र, दुरूनच त्याला कौतुकाने न्याहाळत होते. बाबा गावाहून आल्यावर ह्या गोंड्याचे, 'राजा' असे नामकरण करण्यात आले. मातोश्रींनी गोंड्याला घरात आणण्याच्या विरोधात बंड पुकारलं, परंतू अखेर आमच्याकरता म्हणून माघार घेतली. (का गोंड्याच्या रूपाने तिला भुरळ घातली कोण जाणे! अजूनही पाळीव प्राणी हा आमच्या घरातील एक संवेदनशील विषय आहे!....असो.)

हळूहळू माझी राजा बाबतची भीड चेपली. नव्या नवलाईच्या दिवसात, राजाला आंघोळ कोण घालील, खायला कोण देईल, फिरायला कोण नेईल, केस कोण विंचरेल, प्रत्येक गोष्टीवरून आम्हा बहिणीत भांडणं होत. आमची भांडणं असह्य झाली की बाबा, राजाला 'कुणाला तरी देऊन टाकीन' अशी धमकी देत, की मग आम्ही चिडी-चूप!

Pomeranian कुत्री म्हणे हट्टी असतात. आमचा राजाही त्याला अपवाद नव्हता. आम्ही सगळे घरात असलो, किंवा पाहुणे आल्यावर घरात गप्पा रंगल्या की राजालाही त्यात सहभागी व्हायचे असायचे. अशावेळी, भुंकून, आरडाओरडा करून तो स्वतःला आमच्या कंपूत सामील करून घ्यायचा. घरात घेतल्याशिवाय तो शांतच होत नसे; जिथे माणसं तिथे तो रमायचा.

त्याला औषध घ्यायला लावणे हा एक कसरतीचा प्रकार असायचा. जेवणात औषध आहे, हे पट्ठयाला बरोबर कळायचे. जेवणात लपविलेली औषधाची गोळी वगळून तो सर्व काही संपवायचा तर कधी औषधाचा सुगावा लागल्यावर उपाशी रहायचा. ब्रेड त्याला अतिशय प्रिय, म्हणून आम्ही कधी, ब्रेडच्या तुकड्यात औषधाची गोळी लपवून औषध त्याच्या गळी उतरवायचो, तर कधी तो काहीही केलं तरी गोळी थूंकून आम्हाला वैताग आणायचा!

राजाच्या खाण्यापिण्याच्या आवडीही त्याच्या नावाप्रमाणेच राजेशाही होत्या. ब्रेड आणि भात म्हणजे जीव की प्राण! गोडाचे सर्व प्रकार खायला सदैव तयार. आवडीच्या मेव्याचा सुगावा लागताच, त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलायचे. 'मला खाऊ हवाय' अशी आर्जव त्याचे डोळे करत. थोडं त्याला चिडवायला, थोडं आमच्या मनोरंजनाकरता, आम्ही त्याला आमच्या मागे-पुढे, त्याच्या मागच्या २ पायांवर नाचवत असू. कधी खाऊ लपवून त्याला शोधायला लावत असू तर कधी त्याला उडी मारून खाऊ झेलायला लावत असू.

बागेत येणाऱ्या मांजरींचा, राजाला पाठलाग करायला लावणे हा ही आमचा एक आवडता छंद होता. लहान मुलांना जसे कधी-कधी पोलिसांचा धाक दाखवून, मोठे त्यांच्या मनाप्रमाणे वागवतात, तसा, आम्ही ह्या मांजरींचा वापर, राजाला आमच्या मनासारखे करायला लावायचे असले की करायचो. उदा. राजा उगाच जेवताना नखरे करायला लागला की -

मी - "राजा तुला हे इतकं छान जेवण नकोय नं! जा, त्यापेक्षा त्या शेजारच्या शहाण्या मनीला देते हे."
बहिण - (राजाचं जेवण असलेलं वाडगं उचलून बाहेर नेत)"म्यांव, म्यांSSSव"

बहुतेकवेळा आमच्या ह्या अभिनयाला आणि दटावणीला राजा बळी पडायचा; वाडग्यातलं अन्न झटपट फस्त करायचा. पण कधी कधी मात्र आम्हाला हार मानून त्याच्यापुढे हात टेकायची पाळी यायची. राजा हट्टाला पेटला की खरच आमचा अगदी अंत बघायचा. मग कधी बोलणी, कधी धपाटे खायचा. असा प्रसाद मिळाल्यावर, तो इतक्या केविलवाण्या नजरेने बघायचा की माणूस विरघळलंच म्हणून समजा. काही वेळापूर्वी त्याच्या अंगावर ओरडणारी मी मग, "भुभ्या, सोन्या" करत त्याच्या गळ्यात पडायचे. माझ्या बहिणीची तर त्याच्याशी बोलायची एक वेगळीच भाषा होती!

आम्ही बहिणी जरी राजाच्या प्रेमाकरता भांडलो, तरी त्याची आवडती व्यक्ती म्हणजे आमची आजी! गमतीने आम्ही राजाला 'आजीचं शेपूट' असं चिडवायचो. "आपला आणि ह्याचा काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे", असं आजी नेहेमी म्हणायची.

अनेक आजारपणातून तो सावरला, पण शेवटी-शेवटी तो फारच थकला. सांधेदुखीने व दम्याने त्याचे जिणे नकोसे केले. आम्हाला त्याच्या यातना बघवेनात. अखेर मनावर दगड ठेवून, आम्ही त्याला निरोप द्यायचा निर्णय घेतला. आजही राजा म्हटलं की त्याची विविध लोभसवाणी रूपं डोळ्यासमोर तरळतात. टपोऱ्या, चमकदार डोळ्यांतून संवाद साधणारा राजा, हर्षवायू झाल्यागत शेपटी हालवून माणसाचे स्वागत करणारा राजा, झोपेतून उठल्यावर आळस देणारा राजा, पुढचे पाय पुढे आणि मागचे पाय मागे पसरून ऐटीत बसणारा राजा.

१२-१३ वर्षाच्या सहवासात राजाने आम्हाला भरभरून प्रेम दिले आणि आठवणीच्या कप्प्यात जपून ठेवावे असे कितीतरी सोनेरी क्षण. आज वर्ष झालं त्याला जाऊन, तरी, अजूनही, एखाद्या संध्याकाळी थकून-भागून घरी परतताना असं वाटतं की, धावत, शेपटी हालवत, गोंड्या फाटकाशी येईल!

Saturday, February 11, 2006

ती

ही माझी पहिली कविता. अवचितपणे, काल पहाटे सुचलेली. सकाळी मनात घोळत असलेले शब्द लिहून काढले आणि मग रात्री वेळ मिळाल्यावर त्यांना कवितेत बांधले. मला कल्पना आहे की माझी कविता, पद्याचे अनेक नियम मोडते. वास्तविक माझं काव्यवाचन नगण्य आहे. कुणी वाचून दाखवली तर कविता ऐकायला मला आवडते (आळसाचा कळस!?) आणि तेव्हा झालेल्या चर्चेतून मला ती अधिक चांगली कळते. हे नमनाचे घडाभर तेल, माझ्या कवितेच्या समर्थनार्थ आहे, हे एव्हाना तुम्हा सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच! ;) असो...

तुमच्या सुचनांनी मला माझ्या कवितेतील त्रुटी कळतील आणि सुधारता येतील ह्या अपेक्षेने, माझी कविता इथे प्रदर्शित करायचे धाडस करत आहे...

ती - माणसांत असूनही एकटी,
जगात असूनही नसल्यासारखी.

ती - प्रश्नांच्या भोवऱ्यात उत्तरं शोधत,
जिवंत असूनही स्वतःच्या अस्तित्वाचा उद्देश शोधत.

ती - वाट सापडली आहे असे वाटूनही,
पथदर्शक शुक्राच्या शोधात,

कधी, कुठे उलगडतील ही कोडी??
कुणास ठाऊक....

एव्हाना तिला उमजलय फक्त एवढच,
हा शोध, ही साधना, करायची असते प्रत्येकाने स्वतःच!

(आमच्यातल्या) खेळाडूला जेव्हा जाग येते...

(शीर्षक 'रायगडाला जेव्हा जाग येते'च्या धर्तीवर)....

(भारतात) हिवाळा म्हटलं की हुर्डा पाटर्या, शेकोटया, सकाळचं धुकं, स्वेटर-कानटोप्या घालून बाहेर पडणारी माणसं, अशी चित्रं डोळ्यासमोर सहज उभी रहातात. तसच हिवाळा म्हटलं की शाळा-कॉलेज-ऑफिसातली स्नेहसंमेलनं आणि क्रीडास्पर्धासुद्धा! तर अशाच क्रीडास्पर्धेची वार्ता ऑफिसच्या email द्वारे आमच्यापर्यंत पोचली. Badminton, TT, Cricket अशा ३ खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार होत्या. तिन्ही खेळात सरस ठरणारा संघ क्रीडा-चषकाचा मानकरी ठरणार असे आम्हाला कळले.

एकतर असे स्पर्धात्मक खेळ आम्ही कधी खेळलोच नाही, (त्यामुळे आमच्यात ती स्पर्धात्मक वृती, जिंकण्याची ईर्षा, वगैरे वगैरे नाही! नाहीतर एव्हाना कुठल्याकुठे पोचलो असतो. असो.....हा नाजूक विषय पुढच्या एखाद्या नोंदीत विस्ताराने मांडेन) त्यात स्वभाव भित्रट. त्यामुळे Cricket सारखे अंगाशी येणारे खेळ आमच्या क्षमतेच्या पलिकडले होय. त्यातल्यात्यात घरासमोरच्या गल्लीत Badminton खेळलो होतो. Badminton खेळायला आवडायचं आणि मुख्य म्हणजे ते बऱ्यापैकी जमायचं (म्हणजे माझ्याकडे टाकलेले फूल मला व्यवस्थित परतवता यायचे). त्यामुळे Badminton करता नाव द्यायला हरकत नाही असा विचार सहजच मनात आला. शुभस्य-शीघरम्, असा विचार करत, मी आणि माझ्या एका मैत्रिणीने लागलीच आमची नावं एकेरी व दुहेरी सामन्यांकरता दिली.

गल्लीत Badminton खेळणं वेगळं आणि court वर खेळणं वेगळं, ह्याची आम्हाला जाणीव होती. उगाच स्पर्धेच्यावेळी फजिती नको, म्हणून आम्ही सुट्टीच्यावारी court वर जाऊन सराव करायचा निश्चय केला. तसा आमच्याजवळ महिना होता. एवढया कालावधीत आम्ही बऱ्यापैकी खेळायला लागू असा (उगाच भाबडा?) विश्वास आम्हाला वाटत होता. मग काय, लागलीच शनिवारी जय्यत तयारीनिशी (= tracks, sneakers, professional खेळाडूंसारखी racket, bag, त्यात पाण्याची बाटली, खाऊचा डब्बा, towel...) आम्ही court वर हजर झालो. रगडून सराव करायचा, कुठेही प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत, ह्या अनुषंगाने आम्ही विचार करत होतो. court वर पोचतो तर काय, तिथे आमच्यासारख्या सराव-इच्छुक मंडळींची ही गर्दी! थोडयावेळाने आमचा नंबर लागला. आम्ही तिथल्या मुलांपैकीच दोघांना, आम्हाला नियम समजावून सांगायची व आमच्याबरोबर खेळायची विनंती केली.

सुरूवातीच्या आमच्या खेळाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -

 • प्रतिस्पर्ध्याच्या हातात फूल देणे.
 • हमखास ठराविक चौकोनाच्या बाहेर service करणे.
 • फूल परतवताना अंदाज चुकणे; फूल एकतर आमच्या हद्दीत पडायचे किंवा प्रतिस्पर्ध्याच्या हद्दीबाहेर.

हळूहळू, आमच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनामुळे, आमच्या खेळात सुधारणा होऊ लागली; खेळाचे तंत्र आत्मसात होऊ लागले. आमचे सहकारी पट्टीचे खेळणारे होते. त्यांच्यापुढे आमचा खेळ फिक्काच पडायचा. तरीही आम्ही निराश न होता, मन लावून, (जमेल तसे सरावाच्या नावाखाली ऑफिसातून पळ काढून :) ) सराव करत होतो. आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, (आहेत तरी का?!) कसे आहेत, ह्याची आम्हाला काडीमात्र कल्पना नव्ह्ती.

अखेर आमच्या सामन्याच्या वेळा जाहीर झाल्या. आमच्या संघाला ८ गुण मिळवून देणे आमच्या हातात होते. म्हटलं तर सोप्पं होतं; आम्हाला एकच स्पर्धक संघ होता. ;) आमच्या संघाच्या आमच्या बाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ह्या अपेक्षांचे ओझे, 'आपण-इतका-सराव-करूनही-हरलो-तर', ह्या नामुष्कीचे दडपण अशी आमची मानसिक स्थिती होती. आपला खेळ आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस आहे हे मनाच्या एका कोपऱ्यात होते; पण 'उगाच फाजील आत्मविश्वास नको', असे आम्ही स्वतःला बजावत होतो!

स्पर्धेची सकाळ उगवली. थोडेसे दडपण, थोडासा आत्मविश्वास, थोडसं "विजय-पराजयाचा विचार सोडून देऊ, जे होईल ते होईल, आपण निव्वळ खेळातला आनंद लुटुया" अशी काहीशी आमची मनस्थिती होती. आम्हाला प्रोत्साहन द्यायला, आमचे सहकारी, संघातील इतर खेळाडू हजर होते. दुहेरी सामना आम्ही सहज जिंकला. ह्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. एकेरी सामने जरा चुरशीचे झाले, तरीही, माझी मैत्रिण विजेती तर मी उपविजेती ठरले. आता क्रीडा-चषक आमचाच होता! मग काय सर्वत्र आमचाच जयघोष होता.

आमच्या आयुष्यातला हा पहिला चषक (तो ही क्रीडा स्पर्धेत जिंकलेला!). आम्हाला त्याचे कोण अप्रुप!........काय हसताय...."मटका लागला" म्हणताय! अहो, पुढच्या वर्षीपर्यंत थांबा. आमच्यामधील जागृत झालेला खेळाडू, पुढच्या वर्षीचीही स्पर्धा गाजवणार!

Friday, January 06, 2006

मी अनुभवलेले कोकण

नवीन वर्षाची सुरूवात मी, माझ्या घरच्यांबरोबर कोकणच्या सफरीने केली. ५ दिवसांच्या आमच्या सफरीत आम्ही दिवेआगर, हरिहरेश्वर, जंजीऱ्याचा किल्ला आणि गुहागर ह्या ठिकाणांना भेट दिली. कोकण पिंजून काढायचा म्हटलं तर किमान १५ दिवस हाताशी असावेत असे मला वाटते. असो. ५ दिवस पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात व पूर्णवेळ घरच्यांसोबत, बाहेच्या जगाशी मर्यादित संपर्क - हे ही नसे थोडके!

मी अनुभवलेले कोकण इथे तुमच्यासमोर मांडत आहे; सोबत काही छायाचित्रही जोडत आहे.

१. कोकणचे नजारे


 • उतरत्या छपरांची जवळ-जवळ वसलेली कौलारू घरे.
 • नारळ-पोफळीच्या वाडया.
 • लाल माती उडवत, घुंगरांचा मंजुळ आवज करत जाणाऱ्या बैलगाडया.
 • घनदाट वनराई; आंबा, फणस, काजूची असंख्य झाडे.
 • लाकडच्या मोळ्या विकायला चाललेल्या बायका.
 • मऊ रेतीचे, दिवसाच्या प्रहराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे भासणारे, कधी चमकणारे समुद्रकिनारे.
 • गावातील नीट-नेटकी घरे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर दिसणाऱ्या छोटया-मोठया पाटया. उदा. "येथे कोकणचा मेवा मिळेल" किंवा "घरगुती रहाण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था"
 • नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेला विस्तीर्ण समुद्र - कधी शांत, कधी अवखळ, तर कधी खवळलेला; सुर्यकिरणांच्या खेळामुळे वेगवेगळ्या वेळी वेगळे भासणारे त्याचे रूप - पांढरे, निळे, हिरवे तर कधी गढूळ!


२. कोकणचे नाद • बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या घुंगुरमाळेचा मंजुळ नाद.
 • पहाटे कोंबडयाचे आरवणे.
 • पक्ष्यांचे आवाज.
 • किनाऱ्यावरील पक्षांचा पाठलाग करणाऱ्या, भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या.
 • किनाऱ्यावरील रेतीला लाटांनी चिंब करणारा, खडकांना लाटांनी धपाटे देणाऱ्या समुद्राचा अविरत नाद.
 • मालवाहातूक करणाऱ्या जहाजांच्या, मच्छीमार बोटींच्या मोटारींची धगधग.

३. कोकणचे गंध
 • नुकतेच सारवलेल्या फरशीचा सुगंध.
 • खाडयांचा दर्प.
 • मासळी बाजारातील ताज्या, सुकवलेल्या माश्यांचा वास.
 • पाणी तापविण्यासाठी पेटवलेल्या बंबातून किंवा रात्री पेटवलेल्या शेकोटीतून येणाऱ्या धुराचा गंध.
 • घरगुती खानीवळीतून दरवळणारा गरम-गरम अन्नचा वास.
 • देवळात तेवणाऱ्या समईचा आणि उद-धूपाचा मिश्र सुगंध.

४. कोकणचे स्वाद
 • शहाळ्याचे थंडगार मधुर पाणी, त्यातले कोवळे, लुसलुशीत गोड खोबरे.
 • कोकणचा गोड मेवा - सुकेळी, आंबा पोळी, फणस पोळी.
 • आवळा-कोकमची सरबतं - त्यांची गोड-आंबट-तुरट अशी मिश्र चव.
 • चटकदार पापड लाटया.
 • केळीच्या पानावर वाढलेले, भरपूर ओलं खोबरं घातलेले, साधे, सौम्य जेवण.

५. कोकणचे स्पर्श
 • थंड वाटणारी सारवलेली जमीन.
 • किनाऱ्यावरची मऊ रेती.
 • ओल्या पायांनी अनवाणी चालल्यावर पायाला चिकटणारी, रवाळ लागणारी रेती.
 • किनाऱ्यावरचे काही खडबडीत, काही गुळगुळीत शंख-शिंपले, गोटे.
 • पायांना अवखळपणे हलकेच स्पर्शणारे, अंगावर किंचित शहारा आणणारे समुद्राचे गार पाणी.