Sunday, December 11, 2005

बदलता भारत

अलिकडेच 'बदलता भारत' (लेखक: भानू काळे) हे पुस्तक वाचनात आले. जागतिकीकरण, त्याबरोबर झपाटयाने बदलत जाणारे सामाजिक-सांस्कृतिक जीवन, हे आजकाल चर्चेचे लोकप्रिय विषय आहेत. लेखकाने आपल्या पुस्तकात हेच विषय भारताच्या संदर्भात मांडले आहेत.


भारतभर भ्रंमती करून, तेथील परिस्थितीचे सर्वांगाने निरिक्षण करूनच ह्या पुस्तकातील प्रत्येक लेख जन्मला आहे, हे पुस्तक वाचताना लगेच लक्षात येते. पुस्तकातील प्रत्येक लेख (१-२ अपवाद वगळता) बदलत्या भारतातल्या, लेखकाला उल्लेखनीय वाटणाऱ्या अशा एका शहरावर केंद्रित केला गेला आहे. कोणत्याही देशातील किंवा समाजातील बदलांचा अभ्यास करताना तेथील इतिहासाचा संदर्भ ठेवणे आवश्यक आहे. बदलांचा आलेख रेखाटताना, लेखकाने ठेवलेले हे भान हे ह्या पुस्तकचे वैशिष्टय होय. इतिहासाचा वेध घेतल्यामुळे पुस्तकातील लेख अधिक रंजक आणि माहितीपूर्ण झाले आहेत असे मला वाटते.


विकसनशील देशांमधील शर्यतीत आज भारत निश्चितच आघाडीवर आहे. परंतू आपल्या देशाला-समाजाला विकासाच्या अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. विकासाच्या मार्गात अनेक अंतर्गत-बाह्य अडथळेही आहेत. 'WE ARE STILL LOW IN THE FOOD CHAIN' पण म्हणून आपण स्वतःकडे कमीपणा घ्यायची गरज नाही. आपण कुठे होतो आणि कुठवर आलो आहे, ह्याकडे बघून उत्साहाने आणि सकारात्मक द्रुष्टीकोन ठेवून मार्गक्रमणा चालू ठेवली पाहिजे; लेखकचा हा आशावादी सूर मला महत्त्वाचा वाटतो.


बदलत्या भारतच्या यशात खारीचा वा सिंहाचा वाटा उचलणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे असे मला वाटते.

कबुली

काही दिवसांपूर्वी एका संस्थेच्या दशकपूर्ती समारंभाला जाण्याचा योग आला. खाजगीपणा जपण्याकरता
इथे नावाचा उल्लेख करत नाही. संस्थेच्या कार्याची ओळख वृत्तपत्रातील एका लेखामुळे झाली होती.
अभ्यासपूर्ण पदभ्रमण-गिर्यारोहण हे संस्थेचे मुख्य कार्य. परंतू हे करत असताना त्यांनी समाजिक
बांधिलकी ही जपली होती. "नुसताच निसर्गाचा आनंद लुटण्यापेक्षा त्याच निसर्गात रहाणाऱ्या
निसर्गाच्या लेकरांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न का करू नये?" हा कार्यकर्त्यांचा विचार
मला भावला.


गिर्यारोहणाच्या आवडीमुळे आणि संस्थेच्या उपक्रमांमुळे मी सहाजिकच संस्थेकडे आकृष्ट
झाले. त्यांच्याबरोबर पदभ्रमण करायची संधी कधी मिळेल ह्याची मी आतुरतेने वाट पाहू लागले.
अशातच एके दिवशी एका कार्यकर्त्याचा मला फोन आला. "अमुक दिवशी, अमुक ठिकाणी, इतक्या वाजता संस्थेने 'परिचय मेळावा' योजिला आहे. नक्की येण्याचे करावे," असे निमंत्रण मिळाले. संस्थेच्या
कार्याची अधिक माहिती मिळण्याची, कार्यकर्त्यांशी ओळख होण्याची आणि नवीन माणसं जोडायची ही उत्तम संधी होती. मी माझ्या एका मैत्रिणीसोबत तिथे जाण्याचे निश्चित केले.


ठरल्या दिवशी, दिलेल्या वेळेपेक्षा थोडे उशीराच आम्ही दोघी सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. योजलेले ठिकाण पाहूनच मी थोडी निराश झाले. "आजकालचे समारंभ उगाच भपकेबाज असतात! त्यामुळे, आपल्या अपेक्षेपेक्षा कमी असणऱ्या गोष्टीला सकृतदर्शनी कमी लेखू नये," असे मी स्वतःला लगेच बजावले. कार्यक्रम सुरु झाला नव्ह्ता हे बघून थोडं हायसं वाटलं.


हॉलमध्ये वीस-एक माणसं जमली होती - स्त्रिया नव्ह्त्याच. ना फार पुढे ना अगदी मागे अशा जागी
जाऊन, मी आणि माझी मैत्रिण बसलो आणि कार्यक्रम सुरु व्हायची वाट पाहू लागलो. आजूबाजूचे निरिक्षण चालूच होते. जमलेली बहुतेक मंडळी पस्तीशीच्या पुढचीच वाटली. प्रमुख पाहुणे म्हणून एका ज्येष्ठ इतिहास संशोधकांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुत्रसंचालकाच्या
बोलण्यावरून कळले की हे संस्थेच्या 'दशकपूर्ती वर्ष' होते. कार्यक्रमात सर्वप्रथम संस्थेच्या
कार्याचा आढावा घेण्यात आला. आढाव्यानंतर अनौपचारिक ओळखीचा कार्यक्रम झाला.


हे सगळं चालू असताना मनात कुठेतरी "I DON'T FIT HERE" अशी भावना उसळत होती. अधून-मधून "आपण इथे येण्याचा योग्य निर्णय घेतला का?" असा विचारही मनात डोकावत होता. "EVERYTHING APPEARS YELLOW TO THE JAUNDICED EYE" ह्या इंग्रजी उक्तीप्रमाणे कार्यक्रमात मला दोषच दिसु लागले. प्रमुख पाहुण्यांचे भाषण मला जरा जास्तच नाटयपूर्ण वाटले.


मनातील विचारांमुळे मला कार्यक्रमाचा समरसून आनंद घेता येत नव्ह्ता आणि म्हणून स्वतःचा रागही
येत होता. कार्यक्रम अगदी साधा होता, तिथे आलेली माणसं माझ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील
नव्हती - हे त्यांच्या एकंदर बोलण्यावरून, पेहेरावावरून स्पष्ट होते. पण म्हणून मी त्यांचा, ह्या कार्यक्रमाचा अव्हेर का करावा? माणसाच्या कार्यापेक्षा मी त्याच्या राहाणीमानाला जास्त महत्त्व का देत होते? स्वतःकडे उदंड नसतानाही, आपल्यापेक्षा दुर्बल समाजाला मदत करता येते; ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही सर्व मंडळी होती.


तिथे जमलेली माणसं माझ्या सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील असती तर मला ती अधिक भावली असती का? - कदाचित. ह्या उलट जर ते उच्च्भ्रु वर्गातले असते तर त्यांच्याबद्दल, ह्या कार्यक्रमाबद्दल मला
काय वाटले असते? - "त्यांना काय झालयं हे सगळं न जमायला?" का "उगाच स्तोम माजवत आहेत." असे काहीसे विचार त्यावेळच्या परिस्थितीनुसार आले असते, असे वाटते.


असो. मनातील द्वंद्व चालूच होते. शेवटी काहीतरी निमित्त करून मी आणि माझी मैत्रिण तिथून
सटकलो. मनातील विचारांचा हा तिढा सुटेल तेव्हा सुटो. सध्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना एवढेच
म्हणीन, "तुमच्या पदभ्रमणाला आणि कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा! माझ्या कोत्या मनाला क्षमा
करा."

Saturday, November 19, 2005

भाकर

रेल्वेस्टेशन मुळी कधी झोपतच नसे; सतत येणाऱ्या गाडया, त्यात चढणारे-उतरणारे प्रवासी, त्यांना पोचवायला-घ्यायला आलेली मंडळी, रेल्वे कर्मचारी, स्टॉलवाले आणि रिकामटेकडया लोकांची तिथे सतत वर्दळ असे. त्यातच गेल्या १-२ महिन्यात स्टेशनालगतच्या झोपडपट्टया पुन्हा फोफावल्या होत्या. ह्यामुळे माणसांच्या रहदारीत आणखी भर पडली होती.

रात्रीच्या वेळी, ह्या झोपडपट्टयातील पुरुष मंडळी, स्टेशनवरच्या waiting roomमध्ये किंवा फलाटावरच्या बाकडयांवर झोपायला येत. सकाळी गर्दी वाढायच्या आत ही मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरजण स्टेशनवरच्या स्नानगृहांमध्ये न्हाणी-धुणी उरकत. मग मोठयांना काम असल्यास ते कामावर जात आणि त्यांची पोरं दिवसभर इथे-तिथे उंडारत. महिना-दोन महिन्यातून रेल्वे पोलिस स्टेशनावर गस्त घालत आणि दमदाटी करून ह्या लोकांना हाकलून लावीत. असं झालं की मग ही मंडळी थोडे दिवस स्टेशनापासून लांब राहात, पुन्हा ४-१ दिवस झाले की 'जैसे थे'.

ह्याच झोपडपट्टीत एक कुटुंब होतं परश्याचं. गेली ३ वर्ष गावी दुष्काळ म्हणून शेतावर कामं मिळेनाशी झाली. मग गावातल्या इतरजणांप्रमाणे परश्यानंही शहराकडे धाव घेतली. गावाकडचं किडूक-मिडूक विकून परश्या, त्याची बायको गंगी आणि २ पोरांना घेऊन शहरात आला. त्याच्या गावचा नाम्या ह्याच झोपडपट्टीत रहायचा. नाम्याच्या मदतीने परशा-गंगीने ह्याच झोपडपट्टीत आपला संसार थाटला. परशा-गंगीला २ पोरं; मोठा योग्या आणि त्याच्या नंतर वर्षानेच झालेली सुमा. परशा-गंगीला रोज गावची आठवण येई, पोरं मात्र शहरावर बेहद खुश होते. रस्त्यावरून भरगाव धावणाऱ्या वेगवेगळ्या गाडया आणि घराजवळून जाणाऱ्या लांबचलांब आगगाडया ह्याची त्यांना सर्वात जास्त गंमत वाटत असे. अशी मज्जा नव्ह्तीच मुळी गावाकडे!

परशा-गंगी स्टेशनजवळ्च्या बांधकाम साईटवर मजुरी करत. पुढच्या वर्षीपर्यंत पैसे साठवून पोरांना शाळेत घालयचा निश्चय, परशाने केला होता. परशा-गंगी कामावर गेले, की योग्या आणि सुमा स्टेशनाकडे धाव घेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांकडे बघत, कधी एखाद्या गाडीशी शर्यत लावण्यात त्यांचा वेळ छान जाई. इतर बहिण-भावाप्रमाणे, योग्या सुमाचीही भांडणं होत पण, अगदी क्वचित. तसा योग्या खूपच समजुतदार होता आणि आपल्या धाकटया बहिणीची व्यवस्थित काळ्जी घ्यायचा. सुमाला रंगीबेरंगी चित्रं फार आवडत. कधी-कधी फलाटावर पडलेल्या कागदांच्या कचऱ्यातून, योग्या सुमाकरता चित्र आणत असे. नवीन चित्र पाहून, सुमाची कळी हमखास खुलत असे. मग त्या दिवशी रात्री जेवताना, आपल्या पानातली अर्धी भाकर, सुमा, गंगीची नजर चुकवून योग्याच्या पानात घालत असे.

दिवाळी संपून आता चांगलीच थंडी पडायला लागली होती. शहरात, निवडणूक प्रचारला जोर आला होता. प्रचारच्या घोषणा करत जाणाऱ्या गाडयांची, योग्या सुमाला मोठी गंमत वाटे. नगरसेवक गणपत ढमढेऱ्यांना पुन्हा खुर्ची मिळेल की नाही ही काळजी सतावत होती. मागच्या निवडणूक प्रचारात केलेल्या घोषणा/आश्वासनं आता त्यांना भेडसावत होती. पुन्हा खुर्ची मिळवायची, तर दिलेली काही आश्वासनं पूर्ण करायला हवीत किंवा त्या द्रुष्टीने किमान हात-पाय तरी हालवायला हवेत असा सल्ला, ढमढेऱ्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दिला. विचार विनिमयानंतर, 'अतिक्रमण हटवू' हे आश्वासन पूर्ण करणे हे वेळेच्या आणि इतर सर्वच द्रुष्टीने सोयीस्कर आहे असे ठरले.

आज गंगीला जरा लवकरच जाग आली. रात्री का कोण जाणे तिला नीट झोप आली नाही. उठल्यावरही तिला उगाच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आळस झटकून ती उठली. पोरं, परश्या उठायच्या आत आवरून घ्यावं, म्हणून लगालगा कामाला लागली. सैपाक करायला काहीच नव्हतं, पण आज पगार झाल्यावर सामान आणू असा विचार तिने केला. पोरं दिवसभर उपाशी रहातील ह्या विचाराने ती कळवळली.

"योग्या सुमे, उठा रं पोरांनो" अशा हाका मारत गंगी पोरांना उठवू लागली, कामावर जायची वेळ झाली होती. डोळे चोळत बिचारी पोरं उठून बसली. थंडीमुळे सकाळी उठावसंच वाटायचं नाही त्यांना! "ये पोरांनो, आज काय बी सैपाक केला न्हाई रे ल्येकरांनो! सांच्याला सामान आणून तुमच्या आवडीचं दान्याचं कालवन करीन" एवढं म्हणून गंगी परश्या बरोबर बाहेर पडली.

दिवसभर इकडे-तिकडे भटकल्यामुळे योग्या सुमा पार थकली होती. सकाळपासून अन्नचा एक कणही पोटात गेला नव्हता. संध्याकाळ झाली तशी योग्या सुमाला म्हणाला, "सुमे, बा-आय यायची येळ झाली. चल घरला जाऊ." दोघांच्या मनात, गरम-गरम भाकरी आणि दाण्याच्या कालवणाचेच विचार चालले होते. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि एकमेकाच्या मनातले विचार ओळखले. तसे होताच दोघंही खळाळून हसले आणि हातात हात घालून घराकडे चालू लागले.

गर्दी योग्याला लांबूनच दिसली, बावरून तो इकडे तिकडे बघू लागला. सगळ्या झोपडया जमीनदोस्त झाल्या होत्या. त्याने सुमाचा हात घट्ट पकडला आणि त्यांच्या झोपडीच्या दिशेनी झपाझपा चालायला लागला. तेवढयात त्याला रडण्याचा आवाज आला. त्याने गंगीचा आवाज ओळखला. गर्दी लोटत, सुमाला ओढत, तो पुढे पळत सुटला आणि पुढे जाताच अचानक थबकला. समोर त्याची आय मोठयाने रडत होती, जमीनीवर डोकं आपटीत होती. तिच्यासमोर त्याचा बा निपचीत पडला होता. बाच्या अंगावर जखमा होत्या. योग्या-सुमाला बघून, गंगीने हंबरडा फोडला, "बा गेला रं!!" एवढं म्हणून तिने दोघांन कवटाळले. गंगीला रडताना बघून योग्या-सुमाही रडू लागले.

थोडयावेळाने काही जण 'बा'ला कुठेतरी घेऊन गेले. गंगी रडतच होती. योग्या-सुमा रडतच झोपी गेले. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा गंगी कुठेच दिसेना. आय कामाला गेली असेल असा विचार योग्याने केला. रात्रभर रडल्याने दोघांचे डोळे सुजून लाल झाले होते आणि डोके बधीर. उठताच पोटात भुकेचा राक्षस खवळायला लागला होता. दोघांनीही स्टेशनकडे धाव घेतली - कालच्यासारखं पाणी पिऊन भूक शांत करावी ह्या हेतुने.

फलाटावर चालता चालता सुमाला भाकरीचा एक चतकोर दिसला. तिने योग्याचा सदरा ओढून त्याला बोटानेच तो दाखवला आणि धावत जाऊन उचलला. एवढयात तिला योग्याची चेष्टा करायची हुक्की आली. हातातला भाकरीचा तुकडा त्याला दाखवत, ती पळू लागली. योग्याला हे अनपेक्षित होते, पण लगेच सावरून, तो "सुमे, सुमे!!" करत तिच्या पाठीमागे धावू लागला.

अचानक फलाटावर गर्दी झाली; कुठल्यातरी गाडीचा horn जोरात वाजला. योग्या-सुमाला मात्र गर्दीचे भानच नव्ह्ते. तेवढयात गर्दीमधल्या कुणाचातरी धक्का लागून सुमाच्या हातातला भाकरीचा तुकडा खाली पडला. उचलायला ती खाली वाकली, पण गर्दीचा लोट आला. वाळलेल्या भाकरीच्या चतकोराचे लोकांच्या पायाखाली तुकडे-तुकडे झाले. गर्दी सरली, योग्या सुमाच्या जवळ आला, भरलेल्या डोळ्यांनी आणि खिन्न चेहेऱ्यांनी दोघेही त्या तुकडयांकडे बघत स्तब्ध उभे राहिले.

Thursday, November 17, 2005

सर्कस


आमची रोजच सर्कस होते - ५:५५ची ३२५नंची "मासुळकर कॉलनी - पुणे स्टेशन" बस गाठताना. ५:३०च्या टोल्याला आवरा-सावर करुन आम्ही ऑफीसमधून सटकतो आणि बसचा मुख्य थांबा गाठतो. नेमका आमच्या बसचा थांबा कोणता हे आम्हाला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. अनेक खाणा-खुणा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला (थांब्यावर अर्थातच पाटी नाही); नेपाळ्यांच्या टपरीनंतर, सार्वजनिक शौचालयाच्या अगोदर, ई. पण बस चालक रोज ही ना ती खुण बाद करतात!! असो हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. तसे आता सहप्रवाशांचे चेहेरे ओळ्खीचे झाले आहेत, त्यामुळे ओळ्खीचे चेहेरे दिसतील तिथे जाऊन आम्ही मोक्याची जागा पकडतो.

एका हातात डब्याची पिशवी, त्याच खांद्यावर पर्स, दुसऱ्या हातात mobile, पावसाचे दिवस असल्यास, त्याच हातात छत्री असा आमचा एकंदर अवतार असतो. अधनं-मधनं ओढणी सावरत, आमची स्वारी येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनी बघत असते. येणारी बस आपली नाही अस कळलं की एक उसासा टाकून, घडाळ्याकडे बघत, "येईलच इतक्यात" अशी स्वतःची समजूत घालतो. कधी-कधी चालत थांब्याकडे येणारा एखादा प्रवासी मागून येणाऱ्या बसची वार्ता घेऊन येतो.

शेवटी एकदाची बस येताना दिसते. मग थांब्यावरचा प्रत्येकजण 100m शर्यतीतल्या स्पर्धकासारखा "GET-SET-GO" च्या आविर्भावात सज्ज होतो. रांग-बिंग असा काही प्रकारच नसतो. जस-जशी बस हळुहळु थांब्याकडे येते, तस-तसे प्रवासी मनात बांधलेल्या अंदाजानुसार बसकडे धाव घेतात. काहीजण पुढच्या दारातून चढाई करतात, तर काहीजण आपला मोर्चा मागच्या दाराकडे वळवतात. अशी लढाई देऊन मनासारखी जागा मिळवण्यात एक वेगळच आनंद असतो बरं का! म्हणूनच की काय, कधी बसला गर्दी नसेल, तर बस दिसायचाच अवकाश, धावलेच लोक बसकडे!!!

आमची ही सर्कस ड्रायव्हरसाहेब आणि दारात उभे असलेले कंडक्टरसाहेब बघत असतात. मग कधी-कधी ड्रायव्हरसाहेबांना गंमत करायची हुक्की येते. मग ते, बसची दारं पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यासमोर येतील अशा हिशेबाने बस अचूकपणे आणून लावतात (ह्यालाही कौशल्य लागतं हं!). अशावेळी सर्वांना पाय (पादत्राणे, कधी त्यांच्याखाली येणारे अघळ-पघळ jeans, सलवार.....फॅशनच्चे सध्या तशी!) शुचिर्भूत करून बसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसतो. (आपली संस्कृती आपल्यालच जपायला नको का!)

कधी अचानक ह्या सर्कशीच्या खेळात थोडा बदल होतो. हाश-हुश करत आम्ही छान खिडकीची जागा पटकावतो. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या (की धुराच्या??) झुळुकीबरोबर विसावतो आणि मनातल्यामनात स्वतःच्या चपळाईबद्दल स्वतःला शाबासकी देतो. आम्ही आमच्याच जगात असतो आणि अचानक बसमधील मंडळी (जणू बसला आग-बिग लागली की काय) पळू लागतात. आम्हीही जास्त विचार न करता गर्दीमागे पळू लागतो. नशीब जोरात असेल तर कंडक्टरसाहेबांनी हलक्या आवाजात सांगितलेलं "बस फेल आहे, मागच्यात चढा!!" आम्ही ऐकतो आणि वेळीच सावध होतो. कशी-बशी मागच्या बसमधे जागा पटकावतो आणि दुसऱ्या दिवशी सर्कशीचा खेळ खेळायला पुन्हा सज्ज होतो!

प्रत्येक अनुभवाकडे सकारात्मकतेने बघणारे आम्ही मनातल्या मनात विचार करतो - "चला काही का होईना....आपली चपळाई कायम आहे आणि तशीच राहील ह्या रोजच्या सर्कशीमुळे!!"

आपली बेटं होत आहेत का????

कामाच्या गडबडीत आठवडा कसा गेला हे कळलचं नाही. पहाट झाली, भैरु उठला.....अशाप्रमाणे आठवडयाचे पाच दिवस जातात, मग शनिवार-रविवार आराम! अशाच एका सुट्टीच्या विसावलेल्या संध्याकाळी डोक्यात विचार आला - "आपली बेटं होत आहेत का??" आणि मन अस्वस्थ झालं.

काळ बदलला आणि त्याबरोबर अनेक गोष्टी बदलल्या. एकत्र कुटुंबपद्धतीची जागा, विभक्त कुटुंबपद्धतीने घेतली. ह्ळुह्ळू ह्याचं रुपांतर चौकोनी-त्रिकोणी कुटुंबात होतय. सुट्टीत नातेवाईकांकडे जायच्या नित्यक्रमाची जागा पर्यटन, छंद वर्ग ह्यांनी घेतली आहे. निवांत गप्पा-टप्पांची जागा, कामापुरतेच बोलणे ह्याने घेतली आहे. नातेवाईक मंडळींची भेट लग्न वा इतर कार्यांपुरती मर्यादित झाली आहे. थोडक्यात काय, वेळ नाही म्हणून भेट नाही, भेट नाही म्हणून जिव्हाळा, आपलेपणा नाही. खरचं "आपली बेटं होत आहेत ना!!"

परंपरा म्हणून, जनरीत म्हणून समारंभ-कार्य ह्यांचे सेतू अरुंद का होईना, अजुनतरी शाबूत आहेत. आमच्या नंतरच्या पिढीपर्यंत हे सेतू राहातील??...का आयुष्याच्या महासागरात, एकमेकांना दिसणारी पण दुर्गम अशी नुसती बेटंच राहातील??

Wednesday, November 16, 2005

******* सुस्वागतम ********


नमस्कार वाचकहो!


नोंद स्थळावर मराठीतून लिहिता आले असते, तर किती बरे झाले असते असा विचार गेले अनेक दिवस मनात घोळत होता. परंतु त्या द्रुष्टीने मी internet वर शोध घेतला नाही. इतक्यात काही मराठी, एवढेच नाही, तमीळ नोंद स्थळंही वाचनात आली आणि माझी मराठीतून लिहिण्याची इच्छा आणखीनच प्रबळ झाली.


माझी ही इच्छा मी आमच्या बंधुराजांकडे व्यक्त केली. त्यांनी मला ह्या संबंधी शोध घेण्याचे आश्वासन दिले आणि गंमत म्हणजे एका भल्या माणसाने मला योग्य दिशा दाखवली. मला ही माहिती मिळाल्यावर जणू स्वर्गच गवसल्याचा आनंद झाला!


माझं लिखाण तुम्हाला भावेल, तुमचं थोडंफार मनोरंजनही करेल अशी आशा बाळगते. आणखी एक महत्वाची गोष्ट - तुमचा अभिप्राय द्यायला विसरु नका. तसच तुमचं लिखाण वाचायला मला आवडेल, तेव्हा त्या संबंधीही माहिती नक्की द्या.


अच्छा!!