Saturday, September 15, 2012

आजची चांगली गोष्ट काय?


Inbox मधे ढीगानी Forward केलेल्या emails येत असतात. परंतू क्वचित एखादी मनाला स्पर्शून जाते. अशीच एक email नुकती  वाचनात आली. त्यातला संदेश इतका आवडला की मी ती email घराच्या माणसांना पाठवली. पण काही मोजक्या माणसांपुरता तो संदेश सीमीत राहू नये असं वाटलं आणि म्हणून हा लेखन-प्रपंच....

आपल्या मनात रोज अनेक विचार येत असतात. तसंच वगवेगळ्या भावना ही आपण अनुभवत असतो. कधी कधी मात्र उगाच मरगळल्यासारखं वाटतं, नकारात्मक विचार बळावतात. लक्ष, पेल्यातल्या अर्ध्या रिकाम्या भागाकडे जातं. असं होताच पटकन मन पेल्याच्या अर्ध्या भरलेल्या भागाकडे कसं बरं वळवायचं? प्रत्येक दिवस आनंदी आणि सकारात्मक दृष्टीने कसा जगायचा? ह्या प्रश्नांचे  उत्तर त्या email मधे होते....तर ऐका....

अशी जरा मरगळ येताच स्वतःला प्रश्न विचारा - "आजची चांगली गोष्ट काय?" मग दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा घ्या. दिवसभरात काहीतरी घडलं असेल ज्यामुळे तुम्हाला क्षणभर का होईना आनंद झाला असेल. उदाहरणादाखल - एखाद्या जुन्या मित्राचा अचानक फोन आला असेल...किंवा केलेल्या कामाचे योग्य कौतुक झाले असेल....किंवा दुपारी मस्त झोप झाली असेल...किंवा काहीतरी छान वाचनात आले असेल ...(आलं लक्षात?) त्या चांगल्या गोष्टीची आठवण होताच तुम्हाला मस्त वाटायला लागेल. 

अगदी लहान-सहान गोष्टी आपल्याला आनंद देउन जातात. पण आपण त्यांना लगेच विसरतो. त्या उलट एखादी छोटीशी ठसठस मात्र उराशी बाळगून गोंजारत बसतो.

तेव्हा आठवडाभर हा प्रयोग करून बघा. रात्री झोपताना चांगल्या गोष्टीची स्वतःला आठवण करून द्या किंवा डायरीत लिहून ठेवा...मित्र मंडळी/नातेवाईक जमले की संभाषणाची सुरुवात ह्या प्रश्नाने करा.....जस-जसं हे अंगवळणी पडेल तस-तसं तुम्हाला जाणवेल की दिवसात एकच नाही तर अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात - त्या गोष्टी पकडायची मग सवय लागेल. तर मग करा प्रयोग आणि बघा कसं वाटतंय...

मग, आजची चांगली गोष्ट काय? :)



Tuesday, September 16, 2008

साखळी हायकू

सुमेधानी सुरु केलेल्या साखळी हायकूत एक कडी गुंफण्याची संधी, चक्रपाणिच्या खोमुळे मिळाली. तशी हायकूबद्दल थोडीफार माहिती होती, पण हायकू लिखाणात उडी घेण्याआधी त्याबद्दल थोडा अभ्यास करावा असं वाटलं. सईच्या ह्या आटोपशीर लेखाचा आधार घेत, शब्दांची जुळवा-जुळव करू लागले. सुमेधानी घातलेले नियम आणि हायकू लिखाणाचे नियम संभाळून, शब्दांना हायकूत बांधताना असं लक्षात आलं की वाचताना वाटला होता तितका सोप्पा प्रकार नाही हा!! (हायकू पहावी करून - घर पहावं बांधून सारखं) पदार्थ मनासारखा होईपर्यंत झटणारी मी, हायकूच्या बाबतीतही तितकीच काटेकोर होते. असो, म्हणायला जमली माझी हायकू...तरीही काहीतरी कमी आहे असं वाटतय. बराच विचार केला पण ह्यापेक्षा अधिक सरस काही जमले नाही, त्यामुळे पहिल्यांदा जुळलेली हायकू इथे मांडत. साखळी पुढे नेण्याकरता खो नंदन आणि शैलेशला.

तारकांच्या गर्दीत
चंद्र एकटा
माझा रात्रीचा सखा..

साखळी हायकूचे नियम खालीलप्रमाणे -

१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास
सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.

Thursday, September 11, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदनी सुरु केलेला खो-खो सुमेधा कडून माझ्यापर्यंत पोचला!

गेल्या कित्येक महिन्यांपासून आळसावलेल्या मला, सुमेधानी खो देऊन, (उसनं घेऊन का होईना) लिहायला भाग पाडलं. सुमेधा मला खो दिल्याबद्दल तुझे आभार. तुझ्या खोला प्रतिसाद द्यायला उशीरच झाला - माफ करशील नं? :)

संवेदचे नियम इथे परत देते:

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)

जीवन

अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एका दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थरथरणार्‍या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

- कुसुमाग्रज


चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

- विंदा करंदीकर

माझा खो पामर आणि आदित्यला..

Tuesday, September 04, 2007

फिटे अंधाराचे जाळे


प्रत्येक गाण्याचा साज-बाज वेगळा आणि त्यामुळेच प्रत्येक गाणं मनात वेगवेगळे भावतरंग उमटवते. काही गाणी ऐकताक्षणीच आपल्याला वेड लावतात, तर काहींचा रंग ती वारंवार ऐकल्यावरच चढतो. काही गाणी काळाच्या वेढ्यात असतात; एकेकाळी जणू आपण त्याच्या प्रेमात असतो, पण पुन्हा कधी ते कानी पडलं तर प्रश्न पडतो - 'काय पाहिलं ह्याच्यात?'. काही गाण्यांची गोडी मात्र काळा-वेळाच्या पलीकडची असते. काही गाणी आपल्याला त्यांचाच छंद लावतात; एकदा ऐकून समाधानच होत नाही, लागोपाठ पारायणं करायला लावतात.

आनंदी गाणी मनातल्या पाखराला फुलवतात तर विरह गीतं आपल्याला आर्ततेच्या गर्तेत लोटतात. काही गाण्यांमधे आपल्यात नवीन उमेद निर्माण करायची ताकद असते तर काही आपल्याला तल्लीन करून परब्रम्हाचं दर्शन घडवितात....अशी गंमत आहे गाण्यांची.

बऱ्याच वेळा गाणं सुरू असतं, अगदी आपण ठेका ही धरलेला असतो, पण शब्द मनात रुजायच्या आधीच विरून जातात. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं असं. पुन्हा एखाद्या निवांत क्षणी तेच गाणं लक्षपूर्वक ऐकलं की मनात विचार येतो - "अरे! इतकं सुंदर गाणं....असं कसं दुर्लक्षित राहिलं आपल्याकडून?" परवा संध्याकाळी अगदी अस्संच झालं. संध्याकाळची वेळ होती आणि मी घरी निघाले होते, गाडीत रेडिओ सुरु होता. 'फिटे अंधाराचे जाळे...' हे गाणं लागलं. तसं माहितीतलं गाणं, नेहेमी कानावर पडणारं. पण त्यादिवशी ते लक्षपूर्वक ऐकल्यागेलं आणि त्यातल्या काव्याच्या प्रेमातच पडले मी.

सूर्योदय - अनादि काळापासून, न चुकता रोज घडणारी निसर्गातली घटना. म्हटलं तर रोजचीच, म्हटलं तर नवलाईची, अपूर्वाईची आणि महत्त्वाची सुद्धा! आपल्या विश्वाचे अस्तित्व सूर्यनारायणाच्या कृपेमुळेच आहे, नाही का?

सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय. कवीने म्हटल्याप्रमाणे सूर्योदय नेहेमीच नवीन आशा, नवीन उत्साह घेऊन येतो. हा उत्साह, हा उल्हास मानवी मनापुरताच मर्यादित नसतो तर तो आपल्या भोवतीच्या सृष्टीतही आपल्याला जाणवतो - उजाडताच टवटवीत होणाऱ्या हिरवाईतून, किलबिलणाऱ्या पक्षांमधे. उगवणारा हा आगीचा गोळा जणू आपल्याला सांगत असतो - "मित्रा, गेला दिवस विसरून जा...कुढत बसू नकोस, रडू नकोस...हा घे एक नवीन दिवस...नव्याने सुरुवात कर आणि मस्त जग!"

पण सूर्योदय मनात जे भाव जागवतो ते सूर्यास्ताला नाहीच जमत. सूर्यास्त घेऊन येतो एक उदासवाणी हुरहुर, काळजी; दिसत नसलेल्या उद्याची. रात्री दर्शन देणारा चांदोबा आणि चांदण्याची मजा काही निराळीच. लहान मुलांना जिव्हाळ्याचा वाटणारा चंद्र - चंदामामा, त्यांच्या बालमनाला साद घालणाऱ्या लुकलुकणाऱ्या चांदण्या. तरुणांच्या मनात प्रेमाची कारंजी नाचवणारे ही हेच चंद्र-तारका.

सूर्योदयाबद्दल बोलताच, कौसानीच्या सूर्योदयाचे विलोभनीय चित्र डोळ्यासमोर तरळून जाते. आदल्या दिवशीच्या संध्याकाळी ढगांमुळे सूर्यास्त बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, सूर्योदयाकरता भल्या पहाटे गजर लावून धडपडत उठलो होतो आम्ही. उजाडायची चाहुल लागल्यामुळे पक्षीजगतात जाग झाली होती. आमच्या खोलीच्या बाल्कनीतून हिमाराजींची रूपरेषा दिसत होती - त्रिशुळ, नंदाघंटी, पंचचुली...अशी काही शिखरांची नावं आम्हाला नंतर कळाली. ह्ळूच सूर्याची किरणं एकेका शिखराला प्रकाशून आमच्यासमोर आणत होती. बघताबघता काळोखाची जागा उजेडानी घेतली. पर्वतांवर सोन्याचा मुलामा चढविला आहे असे वाटत होते. आकाशात पिवळ्या-लाल-केशरी रंगांची जणू उधळण झाली होती. असं मनात कायम कोरल्या गेलं आहे हे सूर्योदयाचे चित्र...

असो...सूर्योदयाचे वर्णन करणारं एक गाणं मला कुठल्याकुठे घेऊन गेलं पहा!....


कौसानीचा सूर्योदय

Monday, June 25, 2007

हौसेला मोल नाही



शिंपी आणि सोनार, ह्या समस्त महिलावर्गाचा छळ करायला अस्तित्वात आलेल्या जमाती आहेत, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आत्तापर्यंत माझा हा समज शिंप्यांपुरता मर्यादित होता. परंतू नुकतेच आलेल्या अनुभवांमुळे, सोनारही त्याच माळेतील मणी आहेत, असे मी बिनदिक्कतपणे म्हणीन. 'Promises are meant to be broken' ह्या उक्तीप्रमाणेच, दिलेला वायदा कधीच पाळायचा नसतो, हे ह्या जमातीचे ब्रीद आहे की काय असे मला वाटायला लागले आहे.

शिवायला टाकलेला कपडा असो, किंवा, हौसेने करायला टाकलेला दागिना; कधी एकदा वस्तू आपल्या हातात पडत्ये ह्याची आम्हाला उत्कंठा लागलेली असते. लहान-सहान गोष्टींतून आनंद घेणाऱ्या आम्ही बापड्या. मनातल्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळेपर्यंत, स्वप्नरंजनातूनच त्याचा कोण आनंद घेत असतो. पण ह्या मंडळींना हे कळेल तर शपथ! गिऱ्हाईकांना हेलपाटे घालायला लावणे, (कधी निर्विकारपणे, तर कधी उद्धटपणे बोलून) त्यांना मनस्ताप देणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा आविर्भावात ही मंडळी वावरत असतात. तशा आमच्या अपेक्षा काही फार नसतात हो! नुसत्या सौजन्यपूर्ण वागण्यानेही आम्हाला वश करता येईल, हे कोणी ह्या मंडळींना सांगेल काय? (खरंतर हेलपाटे मारायला लावून ही मंडळी आमच्यावर उपकारच करतात आणि त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत; आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत कुठलीही हालचाल व्यायामाला हातभारच लावते नाही का?)

'गिऱ्हाईक आमचा देव', हा विचार, भिंतीवर चिकटवलेल्या वचनाप्रमाणे ह्या मंडळींनी आपल्या वागण्या-बोलण्यात अंगीकारला तर किती बरे होईल! गिऱ्हाईकांशी सुसंवाद साधून, त्यांच्या मनातले जाणून घेऊन, जर ह्या मंडळींनी कार्य हातात घेतले, तर त्यांना समाधानी गिऱ्हाईक लाभतीलच, शिवाय, उभयतांचा, चुका दुरुस्तीकरणात खर्च होणारा अनावश्यक वेळही वाचेल. असो...माझ्या ह्या प्रेमळ सुचना कोणी माझ्या मित्रांपर्यंत पोचवेल तर फार बरे होईल. तोपर्यंत 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणत हा छळ सहन करत रहाण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते!

टीप: माझी मतं ही सर्वस्वी माझीच असून, ती पूर्णतः 'पुणेरी' अनुभवांवर आधारित आहेत. तुमच्यापैकी कोणाला ह्याहून वेगळे अनुभव आले असल्यास अवश्य कळवा.

Friday, May 18, 2007

अंगठी


काही केल्या बोटातून अंगठी निघतच नव्हती. नुकतंच झोपेतून उठल्यामुळे तिच्या हाताची बोटं किंचित सुजली होती. नेमकी अंगठीच्या जागी एक पुळी आली होती आणि त्यामुळे कधी एकदा अंगठी काढीन असं तिला झाले होतं. वर्ष झालं होतं तिला ती अंगठी घालायला; त्यांच्या घरच्या ज्योतिषीबुवांनीच सांगितली होती तिला पुष्कराजाची अंगठी घालायला. "अंगठी करून घाला; सगळं सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल." त्यांचं हे वाक्य ऐकताच तिचे बाबा तिला सोनाराकडे घेऊन गेले होते. खरतर तिला पहिल्या बोटात अंगठी घालायला मुळीच आवडत नसे; पण बाबांसमोर इलाज नव्हता! सोन्याच्या भावाने ज्या दिवशी उच्चांक गाठला होता त्याच दिवशी त्यांची अंगठीची खरेदी झाली होती. खडा ही चांगलाच घेतला होता. "आता दुनियेतली कुठलीही ताकद माझं बिघडवू शकत नाही," ती बाबांची चेष्टा करायची. आणि खरंच ६ महिन्यात आयुष्याची गाडी व्यवस्थित मार्गी लागली होती. पण काही केल्या बोटातून अंगठी मात्र निघत नव्हती.......

Sunday, April 15, 2007

नाळ

मृण्मयीला जाग आली तेव्हा उजाडूही लागलं नव्हतं. डोळे मिटून, पांघरूणात गुरफटून घेऊन तिने झोपण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण झोप गेली ती गेलीच. शेवटी ती पलंगावर उठून बसली आणि बाहेरचा कानोसा घेऊ लागली. त्यांच्या घराभोवतालच्या परिसरात भरपूर वनराई होती. साहजिकच अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा तिथे वास होता. माणसं जरी पहाटेच्या साखरझोपेत गुरफटली होती तरी पक्षीजगतात मात्र जाग झाली होती.


पक्ष्यांचा ह्या प्रातः संमेलनामुळे पहाट प्रसन्न वाटत होती. मृण्मयी खिडकीपाशी गेली आणि जरावेळ ह्या मैफिलीत रमली. खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याबरोबर मृण्मयीला फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध जाणवला. तेवढ्यात आंब्यावरच्या कोकिळेने "कु ऊS उ" अशी साद दिली. मृण्मयीने गंमत म्हणून तिला प्रतिसाद दिला. थोडावेळ हा खेळ चालला. मृण्मयी स्वतःशीच हसली...


आकाशशी लग्न ठरल्यापासून मृण्मयी आनंदात होती. कसं एका क्षणात सगळं चित्र बदललं होतं. तिच्या विश्वाची व्याप्ती वाढली होती आणि इथून पुढे वाढणारच होती. लग्नाला तसा बराच अवकाश होता. लग्नानंतर मात्र ती तिच्या मातीपासून-माणसांपासून दूर-दूर जाणार होती. आता इथला प्रत्येक क्षण अनमोल होता आणि येणारी प्रत्येक अनुभुति मनाच्या खजिन्यात जपून ठेवावी अशी...


मृण्मयीने मनातल्या मनात यादीच केली...

  • बागेतल्या झाडांशी गप्पा मारणे...
  • पहाटे उठून पक्षी संमेलनाला हजेरी लावणे...
  • आजोबांबरोबर फिरायला जाणे...
  • आजीच्या कुशीत विसावणे...
  • भावंडांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर दंगा करणे...
  • आंब्याच्या मोहराचा, जाई-जुई-चाफा-मोगरा-रातराणीच्या गंधाचा भरभरून आस्वाद घेणे...
  • आई-बाबा नको नको म्हणाले तरीही रात्री त्यांचे पाय चेपून देणे...
  • उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे, आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत, गप्पा मारत झोपेच्या आधीन होणे...
  • संध्याकाळीच्या वारं अंगावर घेत तळ्याकाठी सुर्यास्त बघायला जाणे...
  • मनसोक्त खादडणे...
  • पावसात भिजणे...
  • गौरी-गणापतीच्या आरतीत रमणे...
  • हिवाळ्यात शेकोटीभोवती कोंडाळे करून गप्पा झोडणे...
  • घासाघीस करत खरेद्या करणे...


"हे काय मीनू, आज इतक्या लवकर उठून बसलीयेस", आईच्या आवाजाने मृण्मयी भानावर आली.


"काही नाही गं, असंच" मृण्मयी म्हणाली खरी, पण तिचे पाणावलेले टपोरे डोळे आईच्या सुक्ष्म नजरेतून सुटले नाहीत...