Tuesday, September 04, 2007

फिटे अंधाराचे जाळे


प्रत्येक गाण्याचा साज-बाज वेगळा आणि त्यामुळेच प्रत्येक गाणं मनात वेगवेगळे भावतरंग उमटवते. काही गाणी ऐकताक्षणीच आपल्याला वेड लावतात, तर काहींचा रंग ती वारंवार ऐकल्यावरच चढतो. काही गाणी काळाच्या वेढ्यात असतात; एकेकाळी जणू आपण त्याच्या प्रेमात असतो, पण पुन्हा कधी ते कानी पडलं तर प्रश्न पडतो - 'काय पाहिलं ह्याच्यात?'. काही गाण्यांची गोडी मात्र काळा-वेळाच्या पलीकडची असते. काही गाणी आपल्याला त्यांचाच छंद लावतात; एकदा ऐकून समाधानच होत नाही, लागोपाठ पारायणं करायला लावतात.

आनंदी गाणी मनातल्या पाखराला फुलवतात तर विरह गीतं आपल्याला आर्ततेच्या गर्तेत लोटतात. काही गाण्यांमधे आपल्यात नवीन उमेद निर्माण करायची ताकद असते तर काही आपल्याला तल्लीन करून परब्रम्हाचं दर्शन घडवितात....अशी गंमत आहे गाण्यांची.

बऱ्याच वेळा गाणं सुरू असतं, अगदी आपण ठेका ही धरलेला असतो, पण शब्द मनात रुजायच्या आधीच विरून जातात. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं असं. पुन्हा एखाद्या निवांत क्षणी तेच गाणं लक्षपूर्वक ऐकलं की मनात विचार येतो - "अरे! इतकं सुंदर गाणं....असं कसं दुर्लक्षित राहिलं आपल्याकडून?" परवा संध्याकाळी अगदी अस्संच झालं. संध्याकाळची वेळ होती आणि मी घरी निघाले होते, गाडीत रेडिओ सुरु होता. 'फिटे अंधाराचे जाळे...' हे गाणं लागलं. तसं माहितीतलं गाणं, नेहेमी कानावर पडणारं. पण त्यादिवशी ते लक्षपूर्वक ऐकल्यागेलं आणि त्यातल्या काव्याच्या प्रेमातच पडले मी.

सूर्योदय - अनादि काळापासून, न चुकता रोज घडणारी निसर्गातली घटना. म्हटलं तर रोजचीच, म्हटलं तर नवलाईची, अपूर्वाईची आणि महत्त्वाची सुद्धा! आपल्या विश्वाचे अस्तित्व सूर्यनारायणाच्या कृपेमुळेच आहे, नाही का?

सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा अंधारावरचा विजय. कवीने म्हटल्याप्रमाणे सूर्योदय नेहेमीच नवीन आशा, नवीन उत्साह घेऊन येतो. हा उत्साह, हा उल्हास मानवी मनापुरताच मर्यादित नसतो तर तो आपल्या भोवतीच्या सृष्टीतही आपल्याला जाणवतो - उजाडताच टवटवीत होणाऱ्या हिरवाईतून, किलबिलणाऱ्या पक्षांमधे. उगवणारा हा आगीचा गोळा जणू आपल्याला सांगत असतो - "मित्रा, गेला दिवस विसरून जा...कुढत बसू नकोस, रडू नकोस...हा घे एक नवीन दिवस...नव्याने सुरुवात कर आणि मस्त जग!"

पण सूर्योदय मनात जे भाव जागवतो ते सूर्यास्ताला नाहीच जमत. सूर्यास्त घेऊन येतो एक उदासवाणी हुरहुर, काळजी; दिसत नसलेल्या उद्याची. रात्री दर्शन देणारा चांदोबा आणि चांदण्याची मजा काही निराळीच. लहान मुलांना जिव्हाळ्याचा वाटणारा चंद्र - चंदामामा, त्यांच्या बालमनाला साद घालणाऱ्या लुकलुकणाऱ्या चांदण्या. तरुणांच्या मनात प्रेमाची कारंजी नाचवणारे ही हेच चंद्र-तारका.

सूर्योदयाबद्दल बोलताच, कौसानीच्या सूर्योदयाचे विलोभनीय चित्र डोळ्यासमोर तरळून जाते. आदल्या दिवशीच्या संध्याकाळी ढगांमुळे सूर्यास्त बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, सूर्योदयाकरता भल्या पहाटे गजर लावून धडपडत उठलो होतो आम्ही. उजाडायची चाहुल लागल्यामुळे पक्षीजगतात जाग झाली होती. आमच्या खोलीच्या बाल्कनीतून हिमाराजींची रूपरेषा दिसत होती - त्रिशुळ, नंदाघंटी, पंचचुली...अशी काही शिखरांची नावं आम्हाला नंतर कळाली. ह्ळूच सूर्याची किरणं एकेका शिखराला प्रकाशून आमच्यासमोर आणत होती. बघताबघता काळोखाची जागा उजेडानी घेतली. पर्वतांवर सोन्याचा मुलामा चढविला आहे असे वाटत होते. आकाशात पिवळ्या-लाल-केशरी रंगांची जणू उधळण झाली होती. असं मनात कायम कोरल्या गेलं आहे हे सूर्योदयाचे चित्र...

असो...सूर्योदयाचे वर्णन करणारं एक गाणं मला कुठल्याकुठे घेऊन गेलं पहा!....


कौसानीचा सूर्योदय

3 comments:

Kiran said...

I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.

Sumedha said...

इतका मोठा अबोला सोडणार का?

जागी हो! खो दिलाय!

Sumedha said...

अग पण त्याआधी दिलेला खो घेतलास की नाही?

http://aapula-samwad.blogspot.com/2008/08/blog-post_24.html