Monday, June 25, 2007

हौसेला मोल नाही



शिंपी आणि सोनार, ह्या समस्त महिलावर्गाचा छळ करायला अस्तित्वात आलेल्या जमाती आहेत, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आत्तापर्यंत माझा हा समज शिंप्यांपुरता मर्यादित होता. परंतू नुकतेच आलेल्या अनुभवांमुळे, सोनारही त्याच माळेतील मणी आहेत, असे मी बिनदिक्कतपणे म्हणीन. 'Promises are meant to be broken' ह्या उक्तीप्रमाणेच, दिलेला वायदा कधीच पाळायचा नसतो, हे ह्या जमातीचे ब्रीद आहे की काय असे मला वाटायला लागले आहे.

शिवायला टाकलेला कपडा असो, किंवा, हौसेने करायला टाकलेला दागिना; कधी एकदा वस्तू आपल्या हातात पडत्ये ह्याची आम्हाला उत्कंठा लागलेली असते. लहान-सहान गोष्टींतून आनंद घेणाऱ्या आम्ही बापड्या. मनातल्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळेपर्यंत, स्वप्नरंजनातूनच त्याचा कोण आनंद घेत असतो. पण ह्या मंडळींना हे कळेल तर शपथ! गिऱ्हाईकांना हेलपाटे घालायला लावणे, (कधी निर्विकारपणे, तर कधी उद्धटपणे बोलून) त्यांना मनस्ताप देणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा आविर्भावात ही मंडळी वावरत असतात. तशा आमच्या अपेक्षा काही फार नसतात हो! नुसत्या सौजन्यपूर्ण वागण्यानेही आम्हाला वश करता येईल, हे कोणी ह्या मंडळींना सांगेल काय? (खरंतर हेलपाटे मारायला लावून ही मंडळी आमच्यावर उपकारच करतात आणि त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत; आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत कुठलीही हालचाल व्यायामाला हातभारच लावते नाही का?)

'गिऱ्हाईक आमचा देव', हा विचार, भिंतीवर चिकटवलेल्या वचनाप्रमाणे ह्या मंडळींनी आपल्या वागण्या-बोलण्यात अंगीकारला तर किती बरे होईल! गिऱ्हाईकांशी सुसंवाद साधून, त्यांच्या मनातले जाणून घेऊन, जर ह्या मंडळींनी कार्य हातात घेतले, तर त्यांना समाधानी गिऱ्हाईक लाभतीलच, शिवाय, उभयतांचा, चुका दुरुस्तीकरणात खर्च होणारा अनावश्यक वेळही वाचेल. असो...माझ्या ह्या प्रेमळ सुचना कोणी माझ्या मित्रांपर्यंत पोचवेल तर फार बरे होईल. तोपर्यंत 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणत हा छळ सहन करत रहाण्याशिवाय पर्याय नाही असे दिसते!

टीप: माझी मतं ही सर्वस्वी माझीच असून, ती पूर्णतः 'पुणेरी' अनुभवांवर आधारित आहेत. तुमच्यापैकी कोणाला ह्याहून वेगळे अनुभव आले असल्यास अवश्य कळवा.