Saturday, November 19, 2005

भाकर

रेल्वेस्टेशन मुळी कधी झोपतच नसे; सतत येणाऱ्या गाडया, त्यात चढणारे-उतरणारे प्रवासी, त्यांना पोचवायला-घ्यायला आलेली मंडळी, रेल्वे कर्मचारी, स्टॉलवाले आणि रिकामटेकडया लोकांची तिथे सतत वर्दळ असे. त्यातच गेल्या १-२ महिन्यात स्टेशनालगतच्या झोपडपट्टया पुन्हा फोफावल्या होत्या. ह्यामुळे माणसांच्या रहदारीत आणखी भर पडली होती.

रात्रीच्या वेळी, ह्या झोपडपट्टयातील पुरुष मंडळी, स्टेशनवरच्या waiting roomमध्ये किंवा फलाटावरच्या बाकडयांवर झोपायला येत. सकाळी गर्दी वाढायच्या आत ही मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरजण स्टेशनवरच्या स्नानगृहांमध्ये न्हाणी-धुणी उरकत. मग मोठयांना काम असल्यास ते कामावर जात आणि त्यांची पोरं दिवसभर इथे-तिथे उंडारत. महिना-दोन महिन्यातून रेल्वे पोलिस स्टेशनावर गस्त घालत आणि दमदाटी करून ह्या लोकांना हाकलून लावीत. असं झालं की मग ही मंडळी थोडे दिवस स्टेशनापासून लांब राहात, पुन्हा ४-१ दिवस झाले की 'जैसे थे'.

ह्याच झोपडपट्टीत एक कुटुंब होतं परश्याचं. गेली ३ वर्ष गावी दुष्काळ म्हणून शेतावर कामं मिळेनाशी झाली. मग गावातल्या इतरजणांप्रमाणे परश्यानंही शहराकडे धाव घेतली. गावाकडचं किडूक-मिडूक विकून परश्या, त्याची बायको गंगी आणि २ पोरांना घेऊन शहरात आला. त्याच्या गावचा नाम्या ह्याच झोपडपट्टीत रहायचा. नाम्याच्या मदतीने परशा-गंगीने ह्याच झोपडपट्टीत आपला संसार थाटला. परशा-गंगीला २ पोरं; मोठा योग्या आणि त्याच्या नंतर वर्षानेच झालेली सुमा. परशा-गंगीला रोज गावची आठवण येई, पोरं मात्र शहरावर बेहद खुश होते. रस्त्यावरून भरगाव धावणाऱ्या वेगवेगळ्या गाडया आणि घराजवळून जाणाऱ्या लांबचलांब आगगाडया ह्याची त्यांना सर्वात जास्त गंमत वाटत असे. अशी मज्जा नव्ह्तीच मुळी गावाकडे!

परशा-गंगी स्टेशनजवळ्च्या बांधकाम साईटवर मजुरी करत. पुढच्या वर्षीपर्यंत पैसे साठवून पोरांना शाळेत घालयचा निश्चय, परशाने केला होता. परशा-गंगी कामावर गेले, की योग्या आणि सुमा स्टेशनाकडे धाव घेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांकडे बघत, कधी एखाद्या गाडीशी शर्यत लावण्यात त्यांचा वेळ छान जाई. इतर बहिण-भावाप्रमाणे, योग्या सुमाचीही भांडणं होत पण, अगदी क्वचित. तसा योग्या खूपच समजुतदार होता आणि आपल्या धाकटया बहिणीची व्यवस्थित काळ्जी घ्यायचा. सुमाला रंगीबेरंगी चित्रं फार आवडत. कधी-कधी फलाटावर पडलेल्या कागदांच्या कचऱ्यातून, योग्या सुमाकरता चित्र आणत असे. नवीन चित्र पाहून, सुमाची कळी हमखास खुलत असे. मग त्या दिवशी रात्री जेवताना, आपल्या पानातली अर्धी भाकर, सुमा, गंगीची नजर चुकवून योग्याच्या पानात घालत असे.

दिवाळी संपून आता चांगलीच थंडी पडायला लागली होती. शहरात, निवडणूक प्रचारला जोर आला होता. प्रचारच्या घोषणा करत जाणाऱ्या गाडयांची, योग्या सुमाला मोठी गंमत वाटे. नगरसेवक गणपत ढमढेऱ्यांना पुन्हा खुर्ची मिळेल की नाही ही काळजी सतावत होती. मागच्या निवडणूक प्रचारात केलेल्या घोषणा/आश्वासनं आता त्यांना भेडसावत होती. पुन्हा खुर्ची मिळवायची, तर दिलेली काही आश्वासनं पूर्ण करायला हवीत किंवा त्या द्रुष्टीने किमान हात-पाय तरी हालवायला हवेत असा सल्ला, ढमढेऱ्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दिला. विचार विनिमयानंतर, 'अतिक्रमण हटवू' हे आश्वासन पूर्ण करणे हे वेळेच्या आणि इतर सर्वच द्रुष्टीने सोयीस्कर आहे असे ठरले.

आज गंगीला जरा लवकरच जाग आली. रात्री का कोण जाणे तिला नीट झोप आली नाही. उठल्यावरही तिला उगाच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. आळस झटकून ती उठली. पोरं, परश्या उठायच्या आत आवरून घ्यावं, म्हणून लगालगा कामाला लागली. सैपाक करायला काहीच नव्हतं, पण आज पगार झाल्यावर सामान आणू असा विचार तिने केला. पोरं दिवसभर उपाशी रहातील ह्या विचाराने ती कळवळली.

"योग्या सुमे, उठा रं पोरांनो" अशा हाका मारत गंगी पोरांना उठवू लागली, कामावर जायची वेळ झाली होती. डोळे चोळत बिचारी पोरं उठून बसली. थंडीमुळे सकाळी उठावसंच वाटायचं नाही त्यांना! "ये पोरांनो, आज काय बी सैपाक केला न्हाई रे ल्येकरांनो! सांच्याला सामान आणून तुमच्या आवडीचं दान्याचं कालवन करीन" एवढं म्हणून गंगी परश्या बरोबर बाहेर पडली.

दिवसभर इकडे-तिकडे भटकल्यामुळे योग्या सुमा पार थकली होती. सकाळपासून अन्नचा एक कणही पोटात गेला नव्हता. संध्याकाळ झाली तशी योग्या सुमाला म्हणाला, "सुमे, बा-आय यायची येळ झाली. चल घरला जाऊ." दोघांच्या मनात, गरम-गरम भाकरी आणि दाण्याच्या कालवणाचेच विचार चालले होते. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि एकमेकाच्या मनातले विचार ओळखले. तसे होताच दोघंही खळाळून हसले आणि हातात हात घालून घराकडे चालू लागले.

गर्दी योग्याला लांबूनच दिसली, बावरून तो इकडे तिकडे बघू लागला. सगळ्या झोपडया जमीनदोस्त झाल्या होत्या. त्याने सुमाचा हात घट्ट पकडला आणि त्यांच्या झोपडीच्या दिशेनी झपाझपा चालायला लागला. तेवढयात त्याला रडण्याचा आवाज आला. त्याने गंगीचा आवाज ओळखला. गर्दी लोटत, सुमाला ओढत, तो पुढे पळत सुटला आणि पुढे जाताच अचानक थबकला. समोर त्याची आय मोठयाने रडत होती, जमीनीवर डोकं आपटीत होती. तिच्यासमोर त्याचा बा निपचीत पडला होता. बाच्या अंगावर जखमा होत्या. योग्या-सुमाला बघून, गंगीने हंबरडा फोडला, "बा गेला रं!!" एवढं म्हणून तिने दोघांन कवटाळले. गंगीला रडताना बघून योग्या-सुमाही रडू लागले.

थोडयावेळाने काही जण 'बा'ला कुठेतरी घेऊन गेले. गंगी रडतच होती. योग्या-सुमा रडतच झोपी गेले. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा गंगी कुठेच दिसेना. आय कामाला गेली असेल असा विचार योग्याने केला. रात्रभर रडल्याने दोघांचे डोळे सुजून लाल झाले होते आणि डोके बधीर. उठताच पोटात भुकेचा राक्षस खवळायला लागला होता. दोघांनीही स्टेशनकडे धाव घेतली - कालच्यासारखं पाणी पिऊन भूक शांत करावी ह्या हेतुने.

फलाटावर चालता चालता सुमाला भाकरीचा एक चतकोर दिसला. तिने योग्याचा सदरा ओढून त्याला बोटानेच तो दाखवला आणि धावत जाऊन उचलला. एवढयात तिला योग्याची चेष्टा करायची हुक्की आली. हातातला भाकरीचा तुकडा त्याला दाखवत, ती पळू लागली. योग्याला हे अनपेक्षित होते, पण लगेच सावरून, तो "सुमे, सुमे!!" करत तिच्या पाठीमागे धावू लागला.

अचानक फलाटावर गर्दी झाली; कुठल्यातरी गाडीचा horn जोरात वाजला. योग्या-सुमाला मात्र गर्दीचे भानच नव्ह्ते. तेवढयात गर्दीमधल्या कुणाचातरी धक्का लागून सुमाच्या हातातला भाकरीचा तुकडा खाली पडला. उचलायला ती खाली वाकली, पण गर्दीचा लोट आला. वाळलेल्या भाकरीच्या चतकोराचे लोकांच्या पायाखाली तुकडे-तुकडे झाले. गर्दी सरली, योग्या सुमाच्या जवळ आला, भरलेल्या डोळ्यांनी आणि खिन्न चेहेऱ्यांनी दोघेही त्या तुकडयांकडे बघत स्तब्ध उभे राहिले.

2 comments:

Nandan said...

लेख आवडला. वर्णन अगदी चित्रदर्शी झाले आहे - वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते.

Kedar said...

अकिरा, छान लिहिलय! तुझी लिहिण्याची पध्दत छान आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!