Saturday, July 01, 2006

रंगरंगोटी


गेला महिनाभर घरात रंगाचे काम सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून ह्या कामाला मुहुर्तच लागत नव्ह्ता. तसं रंगकाम बरेच जिकीरीचे काम - रंगाचा वास, घरभर धूळ-पसारा, सामानाची बांधाबांध, हालवा-हालव आणि नंतर आवराआवर; नुसत्या विचारानेच नकोसे वाटते. अखेर काम करायचे निश्चित झाले. मग सतराशे-साठ catalogues बघून रंग संगती, रंगाचे प्रकार वगैरे ठरविण्यात आले.

सर्व रंगाऱ्यांनी मन लावून काम केले. नवीन रंगाचा लेप लावण्यापूर्वी प्रत्येक भिंत घासून काढण्यात आली. आवश्यक असल्यास लांबी लावून ती एकसारखी करण्यात आली आणि मगच त्यावर नवीन रंग चढविण्यात आला. रंगकामानंतर जणू आमच्या घराचा कायापालटच झाला!...सर्व काही चकाचक, नवीन भासू लागले. घरात प्रवेश करताच उत्साही वाटते.

असो, ह्या लेखाचा उद्देश रंगपुराण कथन करणे हा नाही. परवा मनात सहज विचार तरळून गेला - आपलं मनही एखाद्या घरासारखेच आहे. घरात माणसं रहातात, तर मनात विचार वास करतात. घर सुबक, नीट-नेटकं दिसावं ह्याकरता आपण सतत झटत असतो. नव-नवीन सामान आणून त्याची सुबक रचना कर, घराला रंगरंगोटी कर......पण मनाचं काय? आपलं मन कसं आहे ह्याचातरी आपण वेळोवेळी ठाव घेतो का? आपल्या मनातील विचारच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. मग ह्या विचारमंदिराच्या भिंतीही वेळोवेळी नवीन विचारांनी रंगवायला नकोत का? जुन्या, कालबाह्य विचारांना घासून काढून, त्यावर नवीन विचारांचा रंग चढवायलाच हवा.

आजच्या दहिवरासम जगात तग लागण्याकरता आणि आयुष्य समरसून जगण्याकरता, मनावर नवविचारांची रंगरंगोटी, कितीही नकोशी, अवघड वाटली तरीही, आवश्यकच नाही का?

4 comments:

paamar said...

छान... मला वाटते की मनाचे रंगकाम सारखे होतच असते... वाचलेल्या एखाद्या नव्या विचाराने नवा रंग चढतो, एखादे अनपेक्षित वास्तव समोर आले की कधी असलेला रंग उडतो, कधी विषण्ण करणारी परिस्थिती समोर आली की डिप्रेशन ची ओल मनाच्या भिंतीवर चढते !
लेख वाचता वाचता 'रंग दे चुनरिया' या रचनेची आठवण झाली...

Akira said...

@Paamar: Well said and true too :) But don't you think that we don't always devote as much time to self analysis as we should be??..

आदित्य said...

हो खरंच आपलं सुद्धा अगदी घरासारखंच आहे जेव्हा अगदी फारच खराब होतं तेव्हाच हे 'रंगकाम' करतो आपण नाहितर अशी अनेक पुटं काळाबरोबर चढू देतो खुश्शाल!

Gayatri said...

:) मस्तच.