Friday, January 06, 2006

मी अनुभवलेले कोकण

नवीन वर्षाची सुरूवात मी, माझ्या घरच्यांबरोबर कोकणच्या सफरीने केली. ५ दिवसांच्या आमच्या सफरीत आम्ही दिवेआगर, हरिहरेश्वर, जंजीऱ्याचा किल्ला आणि गुहागर ह्या ठिकाणांना भेट दिली. कोकण पिंजून काढायचा म्हटलं तर किमान १५ दिवस हाताशी असावेत असे मला वाटते. असो. ५ दिवस पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात व पूर्णवेळ घरच्यांसोबत, बाहेच्या जगाशी मर्यादित संपर्क - हे ही नसे थोडके!

मी अनुभवलेले कोकण इथे तुमच्यासमोर मांडत आहे; सोबत काही छायाचित्रही जोडत आहे.

१. कोकणचे नजारे














  • उतरत्या छपरांची जवळ-जवळ वसलेली कौलारू घरे.
  • नारळ-पोफळीच्या वाडया.
  • लाल माती उडवत, घुंगरांचा मंजुळ आवज करत जाणाऱ्या बैलगाडया.
  • घनदाट वनराई; आंबा, फणस, काजूची असंख्य झाडे.
  • लाकडच्या मोळ्या विकायला चाललेल्या बायका.
  • मऊ रेतीचे, दिवसाच्या प्रहराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे भासणारे, कधी चमकणारे समुद्रकिनारे.
  • गावातील नीट-नेटकी घरे आणि जवळपास प्रत्येक घरासमोर दिसणाऱ्या छोटया-मोठया पाटया. उदा. "येथे कोकणचा मेवा मिळेल" किंवा "घरगुती रहाण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था"
  • नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेला विस्तीर्ण समुद्र - कधी शांत, कधी अवखळ, तर कधी खवळलेला; सुर्यकिरणांच्या खेळामुळे वेगवेगळ्या वेळी वेगळे भासणारे त्याचे रूप - पांढरे, निळे, हिरवे तर कधी गढूळ!


२. कोकणचे नाद







  • बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या घुंगुरमाळेचा मंजुळ नाद.
  • पहाटे कोंबडयाचे आरवणे.
  • पक्ष्यांचे आवाज.
  • किनाऱ्यावरील पक्षांचा पाठलाग करणाऱ्या, भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्या.
  • किनाऱ्यावरील रेतीला लाटांनी चिंब करणारा, खडकांना लाटांनी धपाटे देणाऱ्या समुद्राचा अविरत नाद.
  • मालवाहातूक करणाऱ्या जहाजांच्या, मच्छीमार बोटींच्या मोटारींची धगधग.

३. कोकणचे गंध




  • नुकतेच सारवलेल्या फरशीचा सुगंध.
  • खाडयांचा दर्प.
  • मासळी बाजारातील ताज्या, सुकवलेल्या माश्यांचा वास.
  • पाणी तापविण्यासाठी पेटवलेल्या बंबातून किंवा रात्री पेटवलेल्या शेकोटीतून येणाऱ्या धुराचा गंध.
  • घरगुती खानीवळीतून दरवळणारा गरम-गरम अन्नचा वास.
  • देवळात तेवणाऱ्या समईचा आणि उद-धूपाचा मिश्र सुगंध.

४. कोकणचे स्वाद
  • शहाळ्याचे थंडगार मधुर पाणी, त्यातले कोवळे, लुसलुशीत गोड खोबरे.
  • कोकणचा गोड मेवा - सुकेळी, आंबा पोळी, फणस पोळी.
  • आवळा-कोकमची सरबतं - त्यांची गोड-आंबट-तुरट अशी मिश्र चव.
  • चटकदार पापड लाटया.
  • केळीच्या पानावर वाढलेले, भरपूर ओलं खोबरं घातलेले, साधे, सौम्य जेवण.

५. कोकणचे स्पर्श
  • थंड वाटणारी सारवलेली जमीन.
  • किनाऱ्यावरची मऊ रेती.
  • ओल्या पायांनी अनवाणी चालल्यावर पायाला चिकटणारी, रवाळ लागणारी रेती.
  • किनाऱ्यावरचे काही खडबडीत, काही गुळगुळीत शंख-शिंपले, गोटे.
  • पायांना अवखळपणे हलकेच स्पर्शणारे, अंगावर किंचित शहारा आणणारे समुद्राचे गार पाणी.

13 comments:

Nandan said...

अकिरा, सुरेख छायाचित्रे आहेत. मला माझ्या गावी (वेंगुर्ला- सावंतवाडी भाग) जाऊन आल्यासारखे वाटले.

Akira said...

धन्यवाद नंदन. पुढच्या भेटीत दक्षिण कोकणाला भेट द्यायचा विचार आहे... Any tips/ideas??

Dhiraj Jain said...

Hey great, Its really nice to read a blog in our own mai marathi.

Dinesh said...

धन्यवाद अकिरा. मी बर्याच काळापासून एक मराठी ब्लॊग सुरू करायचा विचार करत होतो. आज तु दाखवलेल्या वाटेमुळे हे शक्य झाले. माझा ब्लॊग http://aayushya.blogspot.com/ या संकेतस्थळावर पहा.

Kedar said...

Great post and nice photos! Do I see a photographer in the making here ;-)

Jupiter said...

कोकण खरच खूप अप्रतीम आहे. दिवेआगर येथे दोन दिवस राहिलो होतो. त्या दोन दिवसांची आठवण झाली. घरामागील वाडीत फेर-फटका मारणे ह्या सारखे सुख नाही.

फोटोज सुद्धा सही आले आहेत !

Tulip said...

Superb Post. Asa kokan pratyakshat ajun kadhi pahilach nahie. shwaas film madhe pan kokan kiti chhan ani vegal vaatat baghayala.
Akira .. fotos pan khup sunder aahet.

Akira said...

Thanks ppl. Glad you njoyed the post and the accompanying pictures! :)

paamar said...

Hi ! Can you pls contact me at paamar at gmail dot com ?

Aditya said...

awesome ... मजा आली फोटो बघून ... अप्रतीम

आदित्य said...

फारच सुंदर.तुमचे इतरही ब्लॉग वाचले छान आहेत. माझ्या 'गप्पाष्टका' वर कविता आवड्ल्याची तुमची post मिळाली. धन्यवाद !
तुमच्याइतकी लेखन उंची गाठता यावी ही इच्छा!

आदित्य सायगांवकर

Nandan said...

Hi Akira, Long time no post.

Milind said...

सुंदर फोटो आहेत. नव्या वर्षाची सुरुवात मीही कोकणात मुरुडला जाऊन केली होती.
तेव्हा मी मराठीतून blog लिहित नव्हतो,पण या post चे शिर्षक मराठीतच आहे :)