Sunday, June 18, 2006

पावसाच्या गोष्टी - ॥१॥

फेटा सारखा करून, खांद्यावर उपरणं टाकत नाम्या खाटेवरून उठला. "जनेS, येतो गं," असं म्हणत बाहेर जायला निघाला. नाम्याची हाक ऐकताच जनी दारी आली. "आवं," डोक्यावरचा पदर सावरत तिने नाम्याला हाक मारली. नाम्याने नुसतीच मान वळवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजर रोखली. "लवकर येताय न्हवं....बस्ता बांधाया तालुक्याला जायचयं......लक्षात हाय न्हवं...," जमिनीकडे बघत, हलक्या आवाजात तिने नाम्याला लवकर परतायची आठवण करून दिली. "व्हय व्हय, हाय लक्षात," नाम्या जरा गुरकतच म्हणाला आणि चालू लागला. जनी घरात गेली आणि कामाला लागली, पण त्यात तिचे लक्ष लागेना. नाम्याच्या काळजीने तिचा चेहेरा उतरला...

नाम्याचं डोकं आजकाल ठिकाणावरच नसायचं. तीन वर्ष सतत दुष्काळ आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतात पीक असं काही झालच नव्हतं. शेतीकरता घेतलेलं कर्ज वाढतच चाललं होतं. पावसाच्या-पीकाच्या-कर्जाच्या काळजीने नाम्याला पार पोखरून काढले होते. त्यात यंदा चंपीचं लगीन करायचं होतं. ह्या वर्षीही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे नाम्या अधिकच हताश झाला होता.

"ए बाय....बाहेर अंधारून आलय....ये बघ." चंपीच्या आवाजाने जनीची तंद्री भंग पावली. भानावर येत ती "आले, आलेS," म्हणत उठली. परसदारी चंपी हसत काळ्या ढगांकडे बघत होती. जनी बाहेर येऊन आकाशाकडे बघत, हात जोडून काहीतरी पुटपुटली....मग एक सुस्कारा सोडत स्वतःशीच हसली. "बाय, चल बा कडं शेतावर जाऊ," चंपी उत्साहाने म्हणाली. "चल काहीतरीच," असं म्हणत जनीनं तिला उडवून लावलं. पण चंपीनं लकडाच लावला तेव्हा जनी तयार झाली.

पावसाच्या आत शेतावर पोचता यावं म्हणून दोघी लगबगीनं निघाल्या. सुसाट्याचा वारा सुटला होता; छोटी धुळीची वादळं उठवत होता. आकाशात मोठ्ठाल्ले काळे ढग दाटले होते आणि मधूनच गडगडण्याचा आवाज येत होता. जनी-चंपी शेतात पोचल्यातोच टप्पोरे थेंब पडू लागले. बघता-बघता पावसाचा जोर वाढला. जनी-चंपी खिदळत पळायला लागल्या. पावसाचा जोर आणखी वाढला. मुसंडी मारून पळत त्या जवळच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला पोचल्या. चंपीने चेहेरा पुसायला तोंड वर केले, पण समोरचे दृश्य पाहून ती हबकली. "बाSय" एवढेच ती कशीबशी किंचाळली.

फासावर लोंबकळणाऱ्या नाम्याचा निर्जीव देह पाहून जनी तिथल्या-तिथेच थिजली. तिच्या थिजलेल्या नजरेतून एक नवीन पाऊस सुरु झाला होता आणि तुटलेल्या काळजात एक नवीन वादळ...

8 comments:

शैलेश श. खांडेकर said...

अप्रतिम शैलीत लिहीलेली अतिशय वेगवान लघुकथा आणि सुन्न करून टाकणारा शेवट! कथा वाचतांना वाचक आपोआपच अंतर्मुख होतो.

Akira said...

Dhanyawad Shailesh :)

Nandan said...

shailesh shi sahamat. Paavasaashee sambandhitach post, parantu Gheuyaa angaavar paavasaachyaa saree chya agadee viruddha swaroopaache. Donhi tokannaa agadi sakShampaNe haataaLaale aahes.

आदित्य said...

कथा फार छान आहे.पाऊस प्रत्येकासाठी वेगळा असतो (त्याचा अर्थ,भाव) हे प्रकर्षाने जाणवलं. शेवट सुन्न करुन गेला आणि वास्तवाचं भान देवून गेला.

Akira said...

Thanks Nandan, Aditya.

Pavsachya ankheen 2 goshti manat gholat aahet...wel miltaach tya lihun post kareen...

Milind said...

शेवट अनपेक्षित होता.याच्या आधीच्या लेखामुळे असे वाटले. पण अगदी वास्तववादी आहे.

Amruta said...

This reminded me of a lesson in marathi... "लाल चिखल"... i never liked that lesson... nor did i like this post... not because it is bad or something.... it just disturbs me beyond limits....

keeping the facts apart... you've won as a writer ... keep it up

Akira said...

Thanks Amruta. I can understand your feelings.